|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कचरा ‘कोंडी’वर नियोजनाची ‘कांडी’

कचरा ‘कोंडी’वर नियोजनाची ‘कांडी’ 

विजय देसाई/ सावतंवाडी

सावंतवाडी शहर कचराकुंडी मुक्त शहर बनविण्याच्या दृष्टीने सावंतवाडी नगरपालिका ‘मास्टर प्लान’ बनवित आहे. शहरातील कचऱयाची वाढती समस्या लक्षात घेऊन कचऱयाची समस्या दूर करण्यासाठी पालिकेने ही पावले उचलली आहे. त्यादृष्टीने गेले अडीच महिने अभ्यास सुरू आहे. कचऱयाची समस्या दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीही पालिकेकडून सुरू आहे, असे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी सांगितले.

सावंतवाडी नगरपालिकेला 2003 मध्ये स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम
क्रमांक मिळाला होता. स्वच्छ व सुंदर शहर म्हणून पालिकेचा बोलबाला झाला होता. परंतु त्यानंतर दशकाहून अधिक काळ लोटला. शहराचा विस्तार वाढला. नागरीकरण वाढले. त्यामुळे कचऱयाची समस्या उग्र रुप धारण करू लागली. पालिकेने कचऱयाची समस्या सोडविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. परंतु त्या अपुऱया पडू लागल्या. कचऱयाची समस्या सोडविण्यासाठी ठिकठिकाणी कचराकुंडय़ा बसविण्यात आल्या. घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडय़ाही सोडण्यात आल्या. त्यामुळे कचऱयाची समस्या काही प्रमाणात सुटली. परंतु कालांतराने कचराकुंडय़ांची दुरवस्था झाली. कचऱयाच्या समस्येचे विदारक चित्र समोर आले. कचराकुंडय़ांमुळे भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य वाढले. भटके कुत्रे आणि मोकाट जनावरे कुंडय़ांमधील कचरा विस्कटून टाकू लागले. त्यातच प्लास्टिकचा कचराही पालिकेच्यादृष्टीने डोकेदुखी ठरू लागला. कचऱयाची समस्या सोडविण्यात आली नाही तर भविष्यात ती फार मोठी डोकेदुखी ठरू शकेल, हे लक्षात आले. त्यामुळे कचरा समस्या सोडविण्यासाठी पालिकेने पावले उचलली. ‘कचराकुंडीमुक्त शहर’ हा त्यातलाच पहिला भाग आहे. त्यासाठी पालिका ‘मास्टर प्लान’ बनवित आहे.

                          सर्वोदयनगरातून प्रारंभ

सावतंवाडी शहरात साडेसहा हजार निवासी आणि दोन हजार व्यावसायिक इमारती आहेत. या सर्वांचा कचरा कसा गोळा करायचा, याबाबत नियोजन केले. त्याची सुरुवात सर्वोदयनगरातून पहिल्या टप्प्यात केली आहे. ओला, सुका आणि घातक कचरा पालिकेच्या घंटागाडय़ातून गोळा करण्यात येत आहे. ओला कचरा दररोज तर सुका आणि घातक कचरा आठवडय़ातून दोनवेळा गोळा करण्यात येत आहे. शहरात सध्या दहा घंटागाडय़ा कचरा गोळा करतात. या घंटागाडय़ा कचरा गोळा करतात. या घंटागाडय़ांची संख्या वाढविण्याबरोबरच छोटा हत्तीसारखी वाहने खरेदी करून त्यातून कचरा गोळा करण्याबाबत पालिकेचे नियोजन सुरू आहे.

सावंतवाडी शहरातील नागरिक, व्यापाऱयांनी ओला-सुका आणि घातक कचरा विलग करून घ्यावा, यासाठी पालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. काही नागरिकांकडून त्याला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, ओल्या कचऱयाबरोबर प्लास्टिकचाही कचरा देण्यात येतो. त्यामुळे ओला कचरा नष्ट करण्यात अडचणी येतात. यासंदर्भात नागरिकांना सूचना करण्यात येत आहेत. शहरात अनेक निवासी संकुल आहेत. निवासी संकुलाच्या सोसायटय़ांनी स्वत: ओला, सुका आणि घातक कचऱयासाठी डस्टबिन खरेदी करायच्या आहेत. त्यात त्यांनी कचरा टाकून तो पालिकेच्या यंत्रणेकडे द्यायचा आहे. यासंदर्भातील सूचनाही नागरिकांना करण्यात येत आहे. याबाबतची अमंलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे.

 ‘मास्टर प्लान’ लवकरच प्रत्यक्षात

कचराकुंडीमुक्त शहर बनविण्यासाठी पालिका ‘मास्टर प्लान’ बनवित आहे. तो लवकरच प्रत्यक्षात आणण्यात येणार आहे. कचऱयाची समस्या पूर्णपणे सोडविण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे. आता यात कुठलीही हयहय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी द्वासे यांनी सांगितले. कचरा विलग करून देण्याबाबत प्रथम वारंवार सूचना करण्यात येणार आहे. यासाठी आपण स्वत: तसेच नगराध्यक्ष बबन साळगावकर प्रत्यक्ष नागरिकांना भेटून मार्गदर्शन करणार आहेत. त्यातूनही अंमलबजावणी न झाल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

प्लास्टिकपासून इंधननिर्मिती

प्लास्टिक कचऱयाची समस्या मोठी आहे. ते गोळा करून त्यापासून इंधन  निर्मिती करण्यात येणार आहे. हे इंधन ऑईल कंपन्या किंवा फर्नेस निर्मिती कंपन्या विकत घेऊ शकतात. जेजुरी येथे अशाप्रकारचा प्रयोग सुरू आहे. त्याची पाहणी करण्यात आली आहे. प्लास्टिकपासून इंधननिर्मिती करण्यामुळे कचऱयाची मोठी समस्या दूर होणार असल्याचे मुख्याधिकारी द्वासे म्हणाले. ओल्या कचऱयापासून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: