|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » क्रीडा संकुलाच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधले

क्रीडा संकुलाच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधले 

सिंधुदुर्गनगरी : येथील क्रीडा संकुलाच्या दूरवस्थेबाबत राष्ट्रीय काँग्रेस विद्यार्थी संघटनेमार्फत जिल्हाधिकारी उदय चौधरी व जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोर्डवेकर यांचे लक्ष वेधण्यात आले. क्रीडा संकुलाची दुरुस्ती करून सर्व खेळाडूंना ते खुले करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

   विद्यार्थी संघटनेचे जिल्हा सहसचिव अनंतराज पाटकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी आशिष वालावलकर, पंकज कुवळेकर, भुषण शेलटे, हिमांशु त्रिभुवन आदी उपस्थित होते.

     क्रीडा संकुलातील बॅडमिंटन, बास्केटबॉलचा कोर्ट पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे खेळतानात्रास होत आहे. इमारतीचे छप्पर नादुरुस्त असून इमारतीवरील पत्रे फुटल्याने पाण्याची गळती होत आहे. इमारतीची स्वच्छता नसल्याने इमारतीमध्ये पक्षांनी घरटी बांधली असून अस्वच्छता निर्माण झाली आहे.

    इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. वीज व्यवस्था नाही, इमारतीमध्ये इलेक्ट्रीक बोर्ड धोकादायक झाले असून खेळाडूंना शॉक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यायामशाळेतील साहित्य नादुरुस्त झाले असून देखभाल दुरुस्ती नाही. मैदानाशेजारी झाडे-झुडपे वाढली असून मैदानात सरपटणाऱया प्राण्यांचा वावर वाढला आहे. याची गंभीर दखल घेऊन क्रीडा खात्याने तात्काळ क्रीडा संकुलाची देखभाल दुरुस्ती करावी व खेळाडूंना सुसज्ज क्रीडा संकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related posts: