|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जन्मदर घटला, मात्र मृत्यूदर कायम

जन्मदर घटला, मात्र मृत्यूदर कायम 

कणकवली : एकीकडे देशाची किंवा राज्याची लोकसंख्या वाढत असताना सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या लोकसंख्येत दरवर्षी घट होत आहे. जन्मदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने राबविलेल्या कार्यक्रमाचे हे यश असेल किंवा लोकांमध्ये ‘एक किंवा दोन पुरे’ ही मानसिकता असेल. मात्र, दुसरीकडे जिल्हय़ाचा मृत्यूदर काही कमी होताना दिसत नाही. जन्मदर कमी होणे हे जरी आरोग्याच्या ‘यशा’चे द्योतक मानले जात असले, तरीही मृत्यूदरात कमी न होणे या अपयशाला जबाबदार कोण? जनगणनेचा विचार केल्यास 2011 मध्ये सिंधुदुर्गचा जन्मदर 11.1 होता. पाच वर्षांत हा जन्मदर 9.5 पर्यंत खाली आला. जन्मदराच्या घटत्या प्रमाणाचा व मृत्यूदराच्या जैसे थे किंबहुना वाढत्याच प्रमाणाचा विचार केल्यास जिल्हय़ाची लोकसंख्या येत्या काळात कमालीची घटू शकते, अशी शक्यता आहे.

राज्याप्रमाणेच सिंधुदुर्गमध्ये कुटुंब कल्याणचा उपक्रम राबविण्यात येतो. प्रत्येक कामात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रघात असलेल्या या जिल्हय़ात ‘टार्गेट’नुसार काम करताना आरोग्य कर्मचारी अपेक्षेपेक्षा जास्त प्रयत्न करतात. तसेच येथील सुशिक्षित लोक, एक किंवा दोन मुलांनंतर शस्त्रक्रिया करून घेणाऱयांचे वाढते प्रमाण या साऱयामुळे येथील जन्मदरात घट होत आहे.

जन्मदरात घट

सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या सन 2001 च्या जनगणनेनुसार विचार केल्यास जिल्हय़ाची लोकसंख्या 8 लाख 68 हजार 825 एवढी होती. ती 2011 मध्ये 8 लाख 49 हजार 651 एवढी झाली. 2001 मध्ये जिल्हय़ातील लोकसंख्या वाढीची टक्केवारी 4.41 टक्के होती. ती 2011 मध्ये वजा 2.21 टक्के झाली. सन 2011 मध्ये जिल्हय़ाचा जन्मदर 11.1 होता. तो सन 2016 मध्ये 9.5 एवढा झाला आहे. कुटुंब नियोजनच्या कामात उद्दिष्टपूर्ती व सुशिक्षित, साक्षर जनता, जागृती यामुळे जन्मदर कमी झाला असला, तरीही दरवर्षी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे टार्गेट काही कमी होताना दिसत नाही.

मृत्यूदराचे काय?

एकीकडे सिंधुदुर्गचा जन्मदर कमी होत आहे, हे जरी अभिमानास्पद असले तरीही जिल्हय़ाचा मृत्यूदर कमी होत नाही. तो वाढतानाच दिसत आहे. सन 2011 मध्ये मृत्यूदर हजारी 10.10 होता. तो त्यानंतर वाढतानाच दिसतो. सन 2016 मध्ये हा मृत्यूदर 10.30 आहे. म्हणजेच जिल्हय़ात मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी अपेक्षित प्रयत्न झालेले नाहीत किंवा त्या प्रयत्नांना अपेक्षित यश आलेले नाही, असे म्हणावे लागेल. याबाबत आरोग्य विभागाच्या सूत्रांशी संपर्क साधला असता कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह, अपघात अशा कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तसेच जिल्हय़ात लेप्टोपासून माकडतापापर्यंत उद्भवणाऱया विविध साथींमुळे होणारा मृत्यू थांबविण्यात अद्याप आपणाला यश आलेले नाही. त्यामुळे जन्मदरात जरी घट झाला, तरीही मृत्यूदर वाढत असल्याने लोकसंख्येत घटीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

..तर लोकसंख्या आणखी घटणार

जन्मदर कमी होत असला, तरीही त्याच पद्धतीत मृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना न झाल्यास, तशा सुविधा निर्माण न केल्यास भविष्यात जिल्हय़ाची लोकसंख्या अपेक्षेपेक्षा अधिक घटलेली दिसेल, हे सत्य नाकारून चालणार नाही. म्हणूनच आरोग्य विभाग पातळीवर जन्मदर घटण्यासाठी जसे प्रयत्न होतात, त्याचप्रमाणे मृत्यूदर कमी होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. तसेच या प्रयत्नांना शासनाच्या हातभाराची गरज आहे.

वर्ष                 जन्मदर              मृत्यूदर

2011               11.1                 10.10

2012              10.68               10.60

2013               10.02               10.46

2014                9.99                 10.45

2015                 9.8                   10.3

2016                 9.5                   10.3

 

 

Related posts: