|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » फुटबॉलच्या मैदानात संगमेश्वर तालुक्याचा ‘डंका’

फुटबॉलच्या मैदानात संगमेश्वर तालुक्याचा ‘डंका’ 

देवेंद्र शेलारच्या कोरीओग्राफीने जिंकली प्रेक्षकांची मने

शिलाँग येथे 1 हजार खेळाडूंसमवेत साकारली ‘मिशन’

प्रतिनिधी /देवरुख

आयपीएलनंतर आता फुटबॉलच्या मैदानातही संगमेश्वर तालुक्याचा डंका वाजणार आहे. तालुक्याचा सुपुत्र व प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार याने शिलाँग येथे झालेल्या फुटबॉल सोहळय़ात केलेल्या कोरीओग्राफिने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे.

शिलाँगमध्ये सध्या मिशन मेघालय फुटबॉल अंतर्गत 17 आणि 14 वर्ष वयोगटांच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेत देशभरातून 1 हजारपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ात या 1 हजार खेळाडूंना आपल्या मदतीला घेत देवेंद्रने केलेली कोरीओग्राफी लक्षवेधी ठरली. यावेळी देवेंद्र बरोबर त्याचे 30 सहकारी सहभागी झाले होते.

ही कोरीओग्राफी सादर करताना या 1 हजार खेळाडूंना मैदानावर उभे करुन त्यातून ‘मिशन मेघालय फुटबॉल’ ही अक्षरे प्रत्यक्षात मैदानात उमटविली. यावेळी उपस्थित रसिकांनी जागेवर उभे राहून या कलेला दाद दिली. देवेंद्र याने यापुर्वी 1994 साली पुण्यात झालेल्या नॅशनल गेम्स स्पर्धा, 2000 मध्ये हैद्राबाद येथे आफ्रो एशियन गेम्स, 2006 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत, त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये ग्राऊड कोरीओग्राफी केली आहे.

आयपीएल नंतर फुटबॉलच्या ग्राऊंडमध्ये देवेंद्र याने आपला ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे 2015 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासमोर दिल्लीत प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलनात महाराष्ट्रातील पथकाची कोरीओग्राफीही त्यानेच केली होती. देवेंद्र हा मुळचा सांगवे येथील असून सध्या तो देवरुख येथे वास्तव्यास आहे.

आयपीएलनंतर फुटबॉलच्या मैदानावर कोरीओग्राफी करणे आव्हानात्मक काम होते. माझे सहकारी आणि सहभागी खेळाडू यांच्यामुळे ते शक्य झाले.

देवेंद्र शेलार

Related posts: