|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कारगिल : शरीफ, मुशर्रफ झाले असते ठार

कारगिल : शरीफ, मुशर्रफ झाले असते ठार 

वैमानिकाला हल्ल्यापासून ऐनवेळी रोखल्याने टळला मृत्यू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

1999 साली कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाईदलाचा वैमानिक चुकून एका पाकिस्तानी तळाला लक्ष्य करणार होता, या हल्ल्यात पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ तसेच तत्कालीन सैन्यप्रमुख परवेज मुशर्रफ ठार झाले असते अशी माहिती हवाईदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने मंगळवारी दिली. वैमानिकाची चूक लक्षात येताच वरिष्ठांनी त्याला असे करण्यापासून रोखत माघारी बोलाविले होते. 3 मे 1999 ते 26 जुलै 1999 दरम्यान भारत आणि पाकच्या सैन्यादरम्यान झालेले कारगिल युद्ध भारताने जिंकले होते.

जर भारतीय वैमानिकाने पाक तळाला लक्ष्य केले असते, तर दोन्ही देशांदरम्यान व्यापक स्तरावरील युद्ध सुरू झाले असते, पाक प्रसारमाध्यमांनुसार पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि सैन्यप्रमुख परवेज मुशर्रफ त्यावेळी तळावर किंवा त्याच्या नजीकच होते.

कधी झाली होती घटना ?

अधिकाऱयानुसार ही घटना 24 जून 1999 रोजी झाली होती. जर वैमानिकाने लक्ष्य साधले असते, तर अण्वस्त्रसज्ज दोन्ही शेजाऱयांमध्ये व्यापक युद्ध सुरू झाले असते.  कारगिल युद्धादरम्यान हवाईदलाच्या वेस्टर्न एअर कमांडमध्ये संबंधित अधिकारी वरिष्ठ पदावर कार्यरत होता. एका वरिष्ठ अधिकाऱयाने वैमानिकाला कारगिलच्या 4388 पॉइंटवर लक्ष्य भेदण्याचा निर्देश दिला, परंतु वैमानिकाने त्याच्याऐवजी पाकच्या तळावर कॉकपिट लेझर डेजिग्नेशन सिस्टीमद्वारे लक्ष्य निश्चित केले.

तळावर शरीफ होते उपस्थित

24 जून 1999 रोजी शरीफ गुलटेरीमध्ये पाक सैन्याला संबोधित करत होते. शरीफ आणि मुशर्रफ दोघेही तळावरच होते. तत्कालीन वाजपेयी सरकारने हवाईदलाला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याची अनुमती दिली नव्हती.