|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऊस पिकाचे क्षेत्र सुक्ष्मसिंचनाखाली येणार !

ऊस पिकाचे क्षेत्र सुक्ष्मसिंचनाखाली येणार ! 

विजय पाटील/ सरवडे

पाण्याच्या कमीत कमी वापरासाठी जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनखाली आणण्यासाठी सुक्ष्म सिंचन हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे सुमारे 30 ते 50 टक्के पाण्याची बचत होते. यासाठी राज्यातील ऊस पिकाचे क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी योजना आखली असून सन 2017-18 या वर्षात 1.5 लाख व सन 2018-19 या वर्षात 1.55 लाख हेक्टर याप्रमाणे दोन वर्षात 3.5 लाख हेक्टर क्षेत्रावर ही योजना राबवण्यात येणार आहे. याचा लाभ सहकारी साखर कारखान्याबरोबर खाजगी कारखान्यांनाही होणार आहे.

राज्यात उपलब्ध पाणीसाठय़ापैकी सुमारे 60 ते 70 टक्के पाणी सिंचनाखाली वापरण्यात येते. वारंवार पडणाऱया दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करणे क्रमप्राप्त असल्याने कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सुक्ष्म सिंचन हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे 30 ते 50 टक्के पाण्यासह  खते, औषधे यांची देखील बचत होते. तसेच शेतकऱयाच्या उत्पादन व उत्पादकतेत वाढ होते. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जून 2018 पर्यंत राज्यातील 8 प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील बारमाही पिकांना सिंचनासाठी ठिबक व तुषार सिंचन अनिवार्य केले आहे. या प्रकल्पावर या सिंचन पध्दतीचा अवंलब झाल्यानंतर राज्यातील अन्य प्रकल्पांवर हा निर्बंध लागू करण्यात येणार आहे. राज्यात ऊस पिकाचे क्षेत्र विविध कारणांनी वाढत आहे. त्यामुळे पाण्याची गरज सुध्दा वाढत आहे. ऊसाच्या पुर्ण वाढीसाठी 25 हजार घनमीटर हेक्टर इतक्या पाण्याची आवश्यकता असते. या पिकासाटी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास प्रतिहेक्टर 7500 ते 12500 घनमीटर पाण्याची बचत होवू शकते हे ओळखून ऊस पिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या राज्यात ऊस पिकाखालील 9.42 टक्के इतके क्षेत्र आहे. त्यापैकी 2.25 टक्के इतके क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आले आहे. उर्वरीत क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास वाव आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात नदय़ा, नाले, विहीरी, नैसर्गिक प्रवाह, ओढे यांच्या पाण्यावर असलेले 3.05 लाख हेक्टर क्षेत्र दोन वर्षात सुक्ष्म सिंचनाखाली आणण्याची आखणी करण्यात आली आहे. ही योजना सहकारी साखर कारखाने व खाजगी साखर कारखान्यांसाठी राबण्यात येणार असून त्यासाठी शेतकऱयांना प्रतिहेक्टरी 85,400 रूपये सवलतीच्या दराने 5 वर्षाच्या कालावधीसाठी कर्ज दिले जाणार आहे. ज्या भागात ही योजना राबवली जाईल त्या ठिकाणची केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना ऊस पिकासाटी बंद करण्यात येणार आहे.

              कर्जाची उपलब्धता याप्रमाणे

  या योजनेसाठी प्रतिहेक्टरी 85 हजार 400 रूपये सवलतीच्या व्याजात 5 वर्षाच्या कालावधीसाठी कर्ज देण्यात येईल. हे कर्ज केवळ 5 हेक्टरसाठी मर्यादित केले आहे. कर्जासाठी नाबार्डकडून राज्य सहकारी बँकेस 5.50 टक्के दराने, राज्य बँकेकडून जिल्हा मध्यवर्ती बँकाना 6 टक्के दराने व जिल्हा बँकांकडून शेतकऱयांना 7.25 टक्के व्याज दराने उपलब्धता केली जाणार आहे. कर्जाचे वाटपही या साखळीतून करण्यात येणार आहे. तसेच व्याजाचे दायीत्व राज्य शासन 4 टक्के, साखर कारखाना 1.25 टक्के व शेतकरी 2 टक्के याप्रमाणे राहणार आहे.

Related posts: