|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीचे प्रकार पुन्हा सुरु

धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीचे प्रकार पुन्हा सुरु 

वार्ताहर/ मडकई

 दक्षिण गोव्यात धार्मिक स्थळांची व प्रतिकांची तोडफोड करणाऱया फ्रान्सिस्को उर्फ बॉय पेरेरा या संशयिताला अटक झाल्यामुळे हे प्रकार थांबतील असे वाटत होते. मात्र करंजाळ-मडकई येथील ख्रिस्ती बांधवांच्या दफनभूमीमध्ये अज्ञातांकडून करण्यात आलेल्या क्रॉस व थडग्यांच्या तोडफोडीच्या प्रकाराने खळबळ माजली आहे. या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली असून राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

करंजाळ येथील अवर लेडी ऑफ फातिमा या चर्चच्या बाजूला ही दफनभूमी आहे. मडकई, धाकणे, करंजाळ व गावणे भागातील ख्रिस्ती समाज या दफनभूमीचा वापर करतात. मंगळवार 25 रोजी दुपारी दिवोदित सिल्वेरा हे आपल्या एका कुटुंबसदस्याच्या दफनविधीनंतर होणारे सोपस्कार करण्यासाठी तेथे आले होते. यावेळी त्यांना दफनभूमीची लोखंडी गेट तोडलेली दिसली. आंतमधील काही थडगी व त्यावरील क्रॉसही मोडून टाकण्यात आले होते. तसेच अत्यसंस्कारानंतर गुप्त जागी जपून ठेवलेल्या मानवी अस्थी शोधून काढीत त्यांची विटंबना करण्यात आली आहे. सिल्वेरा यांनी त्वरीत या घटनेची माहिती त्वरीत या जागेचे मुख्यत्यार एराज्मो आगियार यांना दिल्यानंतर फोंडा पोलिसांना कळविण्यात आले.

उपनिरीक्षक अरुण बाक्रे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी येऊन पाहणी केली. पंचनाम्यादरम्यान साधारण 12 क्रॉस मोडून टाकल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून सायंकाळी उशिरा दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस, फोंडय़ाच्या उपअधीक्षक सुनिता सावंत, निरीक्षक सुदेश नाईक यांनीही भेट देऊन  तपास पथकाला मार्गदर्शन केले. श्वानपथक व ठसेतज्ञाच्या साहाय्याने तपासाला आवश्यक असलेले काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या घटनेवर सध्या कुणीही भाष्य केले नसले तरी त्यात राजकीय हेतू असल्याची गावात चर्चा सुरु आहे.

सदर दफनभूमी डोंगरमाथ्यावर अज्ञातस्थळी असून तेथे जाण्यासाठी किमान पन्नास पायऱया चढाव्या लागतात. गेल्या 20 जुलै रोजी दिवोदिन सिल्वेरा हे कुटुंब सदस्याच्या अंत्यसंस्कारापश्चात होणाऱया विधीसाठी याठिकाणी आले होते. त्यावेळी सर्वकाही सुरळीत होते. मात्र काल मंगळवारी दुपारी ते पुन्हा येथे आले तेव्हा हा प्रकार घडला होता. त्यामुळे 20 जुलैनंतर गेल्या चार दिवसांमध्ये ही तोडफोड झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. दफनभूमीच्या सभोवताली पक्के कुंपण असून प्रवेश द्वाराला लोखंडी गेट आहे. या गेटला कुलुप लावले जाते. अज्ञातांनी लोखंडी हत्याराने प्रवेशद्वाराची कडी लावण्याचा कोना तोडून आंतमध्ये प्रवेश केला व नंतर क्रॉस व थडग्यांची तोडफोड केली.