|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रेशनवरील पामतेलाची घेतली कार्डधारकांनी धास्ती

रेशनवरील पामतेलाची घेतली कार्डधारकांनी धास्ती 

प्रतिनिधी/ बेळगाव

रेशन दुकानांतून वितरित होणाऱया पदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारींचा सूर ऐकू येत असतो. बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डधारकांना याआधी देण्यात आलेला गहू अनेकदा निकृष्ट दर्जाचा होता, तांदूळही जेमतेमच असायचे. आता जुलैमध्ये या कार्डधारकांना वितरित करण्यात आलेल्या पामतेलाबाबत कार्डधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पामतेलाच्या पाकिटावर जानेवारी 2017 मध्ये पॅकिंग केल्याचा उल्लेख असून जुलैमध्ये त्याचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे कार्डधारकांना हे पामतेल आहारासाठी वापरणे योग्य आहे का? याची चिंता सतावत आहे.

जानेवारीमध्ये पॅकिंग करण्यात आलेल्या पामतेल पाकिटाचे वितरण जुलैमध्ये का करण्यात आले? असा प्रश्न त्यांना पडला आहे. कालबाह्य झालेल्या या पामतेलाचा वापर रोजच्या स्वयंपाकात केल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होणार आहेत का, या विवंचनेत कार्डधारक आहेत. बऱयाच कुटुंबीयांनी रेशनवरील या पामतेलाचा वापर आहारासाठी न करता देवासमोर लावण्यात येणाऱया दिव्यासाठी करण्यास प्राधान्य दिले आहे. या पामतेलाच्या वितरणावरून सध्या कार्डधारकांत निर्माण झालेल्या गोंधळाबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या उपसंचालिका सईदा अफरीनबानू बळ्ळारी यांना विचारले असता, हे पामतेल वापरण्यायोग्य असून कार्डधारकांनी याची धास्ती घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  या आधीही बीपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांना पामतेलाचे वितरण करण्यात येत होते. मात्र मार्चपासून ते स्थगित करण्यात आले. त्यानंतर जुलैमध्ये पुन्हा या पामतेलाचे वितरण सुरू करण्यात आले. दरम्यान, मार्चमध्ये मागविण्यात आलेला पामतेल पाकिटांचा पुरवठा या महिन्यात करण्यात आला आहे. यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे खात्याच्या उपसंचालिका बळ्ळारी यांनी सांगितले. तसेच पुढील महिन्यापासून पामतेल विक्री बंद करण्यात येणार असून केवळ तांदूळ आणि तूरडाळ कार्डधारकांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कालबाहय़ झालेल्या या पामतेल वितरणाचा मुद्दा सोमवारी झालेल्या केडीपी बैठकीतही चर्चेत आला होता. यावेळी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि आमदार लक्ष्मण सवदी यांनी पामतेल पाकिटावरील पॅकिंगबद्दल कार्डधारकात भीतीचे वातावरण पसरल्याचे सांगितले होते. पामतेल वितरण बंद करण्यात यावे, अशी मागणी केली होती. याची दखल जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी घेऊन पामतेलाचे वितरण बंद करावे, अशी सूचना बळ्ळारी यांना केली होती. मंगळवारी बळ्ळारी यांनी केडीपी बैठकीत झालेल्या या सूचनेनुसार पामतेल बंद करण्याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या आयुक्तांना पत्राद्वारे कळविले आहे.