|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सटमटवाडीने घेतला मोकळा श्वास

सटमटवाडीने घेतला मोकळा श्वास 

बांदा : गेले सहा महिने मृत्युची टांगती तलवार घेऊन वावरत असलेल्या आणि माकडतापाच्या थैमानाने त्रस्त झालेल्या सटमटवाडीने पावसाच्या तुफान बरसातीनंतर मोकळा श्वास घेतला आहे. माकडताप गोचिडीमुळे होत असल्याने व मुसळधार पावसामुळे गोचिड नष्ट झाल्यामुळे माकडताप व पर्यायाने मृत्यूची भीती काहीशी दूर झाली आहे.

माकडतापामुळे काजू पिकाकडे पाठ फिरविलेल्या ग्रामस्थांनी मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा काजू बागायतीच्या दिशेने आपली पावले वळवली आहेत. पुढील हंगामातील पीक मिळण्याबाबत अस्थिरता कायम असली तरी सकारात्मक विचार करून काजू लागवडीच्या मशागतीला बागायतदारांनी प्रारंभ केला आहे. काजू लागवड, खत मारणे आदी कामे आता सुरू झाली आहे. दुसरीकडे आरोग्य विभागही सतर्क झाला असून व्हॅक्सिन डोस देण्याचे काम खास पथकाकडून सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 51 हजार व्हक्सिन डोसची मागणी करण्यात आली असून बांदा आरोग्य केंद्रांतर्गतच्या सर्व गावातील लोकांना हा डोस देण्यात येणार असल्याचे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.

गतवर्षी जानेवारी महिन्यात बांदा-सटमटवाडी, डिंगणे, गाळेल या भागात माकडतापाने थैमान घातले होते. यामध्ये तेराजणांचा बळी गेला होता. गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोचिड पूर्णतः नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱयांच्या मनात दाटलेली भीती काहीशी दूर झाली आहे. या हंगामातील काजूपिकाकडे शेतकऱयांनी पूर्णतः पाठ फिरविली होती. येथील शेतकऱयांच्या उपजीविकेचे मुख्य साधन काजू हेच आहे. सद्यस्थितीत माकडतापापासून बचावलेल्या बागायतदारांना हलाखीचे दिवस काढावे लागत आहे. पुढील हंगामातील काजू पीक मिळण्याबाबत साशंकता असली तरी नव्याने काजू लागवड व खत घालण्याच्या कामाला येथील शेतकऱयांनी प्रारंभ केला आहे.

सर्वाधिक फटका सटमटवाडी, गाळेलवासीयांना

माडकतापाचा सर्वाधिक फटका सटमटवाडी व गाळेल येथील शेतकऱयांना बसला आहे. माकडतापामुळे मृत्यू झालेल्या तेरापैकी सातजण सटमटवाडीतील हेते. 90 घरे व 600 लोकवस्तीच्या या भागातील प्रत्येक कुटुंबाचे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून एक लाखाचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. मात्र, नुकसाग्रस्त शेतकरी या भरपाईपासून वंचित राहिला आहे. सहा महिन्यानंतर येथील ग्रामस्थांची माकडतापाची भीती प्रथमच दूर झाल्याचे चित्र आहे.

आरोग्य विभाग सतर्क

माकडतापाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सटमटवाडी, गाळेल या भागाबरोबरच इतर लगतच्या गावात माकडतापाचा शिरकाव होऊ नये, यासाठी बांदा आरोग्य विभागाकडून उपायोजना सुरू आहेत. यासाठी 21 जणांची टीम कार्यरत आहे. मणिपाल हॉस्पिटलचे पथकही बांदा आरोग्य केंदात असून 2018 पर्यंत हे पथक कायम राहणार आहे. गोचिडीला कंट्रोल करणारा व्हॅक्सिन डोस
ग्रामस्थांना देण्याचे काम सुरू असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

एका भागात पोहोचल्यानंतर पुढील वर्षी त्याच भागात माकडताप राहण्याची शक्यता कमी असते. गतवर्षी केर (दोडामार्ग) येथे माकडतापाची साथ होती. मात्र, यावर्षी हीच साथ बांदा परिसरात आल्याचे डॉ. पाटील म्हणाले. व्हॅक्सिन डोसमुळे माकडतापाने मृत्यू होण्याची शक्यता 70 टक्के कमी असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घरोघरी हा डोस दिला जात आहे. केवळ माडकतापाने बाधित गावांचा विचार न करता बांदा प्राथमिक आरोग्य केंदांतर्गतच्या सर्व गावांमध्ये घरोघरी डोस दिला जाणार आहे. सध्या यासाठी 21 जणांचे पथक कार्यरत असून 200 व्हॅक्सिन डोसचे वितरण झाले आहे. 51 हजार व्हॅक्सिन डोसची मागणी करण्यात आली असून लवकरच हे डोस आरोग्य केंद्रात उपलब्ध होतील, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

आजचे मरण उद्यावर…

माडकतापाच्या धक्क्यातून सावरलेले सटमटवाडीतील शेतकरी दशरथ परब म्हणाले, मला माझी आई (अनुसया लवू परब) गमवावी लागली. आमच्या वाडीतील अन्य आठ जणांचा मृत्यू झाला. मी व माझ्या घरातील अन्य सदस्य सुदैवानेच बचावलो. मात्र, आजचे मरण उद्यावर गेले, असेच वाटू लागले आहे. एकीकडे आमची रोजीरोटी नष्ट होत आहे. दुसरीकडे मृत्यूची टांगती तलवार आहे. पावसामुळे आता धोका नसल्याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, पुन्हा जानेवारीत साथ आली तर काय करायचे? आणखी कितीजणांचे बळी जाणार? किती वर्षे काजू पिकाचे नुकसान सहन करणार, असे अनेक प्रश्न मनात थैमान घालत आहेत.

Related posts: