|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरातमध्ये राज्यसभेसाठी रणधुमाळी

गुजरातमध्ये राज्यसभेसाठी रणधुमाळी 

काँग्रेसकडून खासदार अहमद पटेल यांना उमेदवारी : भाजपकडून अमित शहा यांची मोर्चेबांधणी सुरू

वृत्तसंस्था /  अहमदाबाद

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी गुजरात दौऱयावर असून, दरम्यानच्या काळात राज्यसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सद्यस्थितीत अमित शहा अहमदाबादमधील नारणपुरामधून आमदार आहेत. मात्र, ते आगामी विधानसभा लढविणार नसून, राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. विशेष राजकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या गुजरातमधून राज्यसभेसाठी इच्छुक नसल्याचे समजते. दरम्यान, राज्यसभेसाठी काँग्रेसने पाचवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या अहमद पटेल यांना उमेदवारी देऊन विरोधकांसमोर प्रबळ आव्हान उभे केले आहे.

 वर्षाअखेरीस होणाऱया गुजरात विधानसभा निवडणुका पाहता भाजप पक्षश्रेष्ठींकडून स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला संधी देण्यात येणार असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील विरोधी पक्ष एकसंध होत असून आगामी रणनितीसाठी सज्ज होत असल्याचे चित्र आहे. खासदार अहमद पटेल यांनी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जदयू त्यांच्या समर्थनार्थ भक्कमपणे उभे राहिले आहेत. गेल्या आठवडय़ात राजीनामा दिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पटेल यांच्या पारडय़ात मत टाकण्याची घोषणा केली आहे.

 खात्रीशीर सूत्रांच्या मते, भाजपाध्यक्ष अमित शहा पक्षाच्यावतीने उमेदवारीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार असून, स्मृती इराणी मध्यप्रदेशमधून आपला अर्ज राज्यसभेसाठी दाखल करणार आहेत.

ज्येष्ठ नेते वाघेला यांचा  पटेल यांना पाठिंबा

गुजरातमधून राज्यसभेच्या तीन जागा पुढील महिन्यात रिक्त होत आहेत. यापैकी एका जागेवर राज्यसभा खासदार अहमद पटेल यांनी उमेदवारी दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्ष डी. एम. पटेल यांच्यासमक्ष त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी अहमद पटेल यांनी आपला बिनशर्त पाठिंबा असल्याची जाहीर घोषणा केली आहे. पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वाघेला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत विस्तृतपणे चर्चा केली. काँग्रेस आमदार एकनिष्ठ असून पटेल यांना 55 पेक्षा अधिक मते मिळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 विरोधी पक्षनेतेपदी राठवा यांची नियुक्ती

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ आमदार, आदिवासी नेते मोहनसिंह राठवा यांच्याकडे पक्षाने विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवली आहे. गेल्या आठवडय़ात वाघेला यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. राठवा हे 1972 पासून विधानसभेचे सदस्य आहेत. आतापर्यंत 9 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. आदिवासी मतदारसंघ असलेल्या उदेपूरमध्ये त्यांचे मोठे प्राबल्य आहे. आदिवासींची ‘व्होट बँक’ आकर्षित करण्यासाठी गुजरात काँग्रेसची ही मोठी खेळी असल्याचे समजले जात आहे.

Related posts: