|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिहारमध्ये जोरदार राजकीय भूकंप

बिहारमध्ये जोरदार राजकीय भूकंप 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, लालू यादवांशी युती तुटली

पाटणा / वृत्तसंस्था

बिहारमध्ये 20 महिन्यांपूर्वी प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेली नितीशकुमार-लालू प्रसाद यादव युती आता तुटली आहे. लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांनी वैतागलेले मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता राज्यात संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्यात पुन्हा युती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाऱयांची साथ सोडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांचे अभिनंदन केले आहे.

राजीनाम्यानंतर लगोलग भाजपच्या बिहार शाखेची बैठक होऊन त्यात नितीशकुमार यांना विनाअट पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसातच पुन्हा नितीशकुमार यांच्या नेतृत्वात संजद आणि भाजप युतीचे सरकार स्थानापन्न होण्याची शक्यता आहे.

बुधवारी दिवसभर घडलेल्या नाटय़मय घटनांनी बिहारबरोबरच देशाच्याही राजकारणात प्रचंड खळबळ उडवली आहे. या घडामोडींचे दूरगामी परिणाम संभवत असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातही त्या महत्वाच्या आहेत, असे तज्ञांचे मत आहे. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात पुन्हा हातमिळवणी झाल्यास तोही अतिमहत्वाचा बदल मानला जाणार आहे. या दोन्ही पक्षांमधील 17 वर्षे चाललेली युती 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी तुटली होती.

तेजस्वी यादवांचा राजीनाम्यास नकार

मंगळवारी नितीशकुमार यांनी काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना युती वाचविण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितल्याची चर्चा होती. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संजद कडून करण्यात आली होती. तथापि, बुधवारी दुपारी पत्रकारांसमोर बोलताना लालूप्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव राजीनामा देणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. तसेच नितीशकुमार त्यांच्यावरील ओझे दूर करणार असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे, अशीही टिप्पणी केली होती. तेव्हापासूनच युती संकटात असल्याचे संकेत मिळत होते. नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेलाच नाही. मग तो देण्याचा प्रश्न येतोच कोठे, असा प्रतिप्रश्न लालू यादव यांनी केला होता.

नितीश राज्यपालांच्या भेटीला

लालू यादव यांच्या नकारानंतर त्वरीत नितीशकुमार यांनी आपल्या सहकाऱयांची बैठक बोलावून पुढील योजना ठरविली. ते संध्याकाळी पावणेसात वाजता तडक राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्या भेटीला गेले. तेथे त्यांनी राजीनामा सादर करून लालू प्रसाद यादव यांच्यावर जणू राजकीय बाँबच टाकला. राज्यपालांनी आपला राजीनामा स्वीकारल्याचेही त्यांनी राज्यपाल भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना घोषित केले.

आपण 21 महिन्यांपूर्वी राजदशी युती केली. युतीला जनतेने मोठा जनादेश दिला. पण ही युती बिहारच्या कल्याणासाठी होती. केवळ सत्ता मिळविण्यासाठी नव्हती. तथापि, आता युतीचा हा उद्देश साध्य करणे अवघड झाले आहे. सहकाऱयांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असताना त्यांच्यासमवेत काम करणे कठीण आहे. मी कधीही तत्व आणि प्रामाणिकपणा यांच्याशी तडजोड केली नाही. आजही करणार नाही. साहजिकच माझ्यासमोर राजीनामा देण्यावाचून दुसरा मार्ग राहिला नाही. आपण राजीनामा देऊन योग्य तेच केले आहे, असे विश्वासपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

मोदींकडून अभिनंदन

नितीशकुमार यांच्या राजीनाम्याचे वृत्त येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले. तसेच बिहार भाजपनेही त्यांना विनाअट पाठिंबा देत असल्याचे घोषित केले. संदज आणि भाजप एकत्र आल्यास नितीशकुमार यांच्यासमोर बहुमताची कोणतीही अडचण येणार नाही, अशी स्थिती आहे.

लालू यादवांचीही पत्रकार परिषद

नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर लालू यादव यांनीही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर व भाजपवर आगपाखड केली. कुमार यांचा राजीनामा अगोदरच ठरलेला होता. हे त्यांचे आणि भाजपचे सेटिंग आहे. बिहारच्या जनतेच्या जनादेशाचा त्यांनी घोर अपमान केला आहे. जनता त्यांना धडा शिकविल्याखेरीज राहणार नाही. तेजस्वी यांना नितीशकुमारांनी केवळ स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. राजीनामा देण्यास नाही. पण त्यांना आमच्याबरोबर रहायचेच नव्हते. त्यासाठी ते निमित्तच शोधत होते. स्वतः नितीशकुमार यांच्यावर खुनाचा आरोप आहे. त्यातून सुटका करून घेण्यासाठी ते भाजपच्या गळय़ात पडले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांपेक्षा अत्याचाराचे आरोप मोठे असतात, अशी अनेक मुक्ताफळे त्यांनी उधळली.

भाजपशी हातमिळवणीस नकार नाही

बिहारच्या हितासाठी जे योग्य असेल ते करू, अशा शब्दात नितीशकुमार यांनी भवितव्याविषयी राजीनाम्यानंतर टिप्पणी केली. त्यांनी भाजपशी हातमिळवणी होण्याची शक्यता नाकारली नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते.

Related posts: