|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कारखान्यांच्या रसायन मिश्रीत पाण्याचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन

कारखान्यांच्या रसायन मिश्रीत पाण्याचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन 

वार्ताहर/ गोकुळ शिरगाव

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांनी सोडलेले रसायनमिश्रीत पाणी थेट तामगाव येथील ओढय़ात मिसळत आहे. त्यामुळे तामगाव, सांगवडे, मुडशिंगी या गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी हे रसायन मिश्रीत पाणी बंद न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला.

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील कारखानदार तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांची बैठक येथील गोशिमा कार्यालयात झाली. यावेळी शिवसेनेच्यावतीने निवेदनाद्वारे हा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे तसेच कोल्हापूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्यावतीने अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांचे रसायन मिश्रीत सांडपाणी थेट तामगाव येथील ओढय़ात सोडले जाते. ही गंभीर बाब असून, ज्या कारखान्यांमध्ये असे दूषित रासायनिक पाणी तयार होते. त्यावर प्रक्रिया करण्याची  यंत्रणा त्या संबंधित कारखानदारांनी उभी करणे कायद्याने बंधनकारक आहे. याबाबतची कल्पना कारखानदारांना कारखाना उभा करताना दिलेली असते. परंतु याची अंमलबजावणी होत नसल्याने अशा प्रदूषित पाण्यामुळे ओढय़ाचे पाणी दूषित होते. शिवाय हे दूषित पाणी जमिनीत झिरपून ओढय़ाशेजारी असलेल्या विहिरी, कूपनलिका यांच्यात मिसळून ते खराब होते. त्यामुळे नागरिकांसह पाळीव जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी या ओढय़ाचे दूषित पाणी पिल्याने कित्त्येक जनावरे दगावली आहेत. त्याचबोबर या रासायनिक पाण्यामुळे आसपासची शेतीसुध्दा बाधित झाली असून, शेती उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. रसायन मिश्रीत पाण्यामुळे संपूर्ण तामगाव गाव आज ओढय़ाच्या पाण्यामध्ये आपली जनावरे घेऊन जाण्यास घाबरत आहेत. पण जनावरांना पावसाळय़ात ओढय़ाशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे या रसायन मिश्रीत पाण्याचा वेळीच बंदोबस्त होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे रसायन मिश्रीत पाणी ताबडतोब बंद करण्याचे निवेदन गोशिमामध्ये बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांना देण्यात आले.

यावेळी खेडकर यांनी ज्यावेळी कारखानदार आपला कारखाना उभा करतात, त्यावेळी त्यांना घनकचरा, जलप्रदूषण, हवा प्रदूषण होणार नाही या तीन अटी घातल्या जातात. याचे जो कारखानदार पालन करीत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाते. जर त्याला कचरा टाकण्यासाठी जागा नसेल तर एमआयडीसीची राखीव जागा असते. त्या ठिकाणी तो टाकला पाहिजे. अन्यथा त्या कारखानदारावर तातडीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गोशिमा चेअरमन सुरजित पोवार म्हणाले, गोशिमाच्यावतीने सर्व कारखानदारांनी आपल्या कारखान्यातील खराब पाणी बाहेर जाऊ न देता त्या पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करावी. तसेच तेच पाणी पुन्हा वापरात कसे घेता येईल याचे नियोजन करावे. आपल्या कारखान्याचे रसायन मिश्रीत पाणी, घनकचरा आदी गोष्टी बाहेर जाऊ न देता तो आपण कसा निपटारा करायचा याचे नियोजन केले जाईल व या औद्योगिक वसाहतीच्या शेजारील गावांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाई, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पोवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, रवी चौगुले, राजू यादव, संजय जाधव, भगवान कदम, विनोद खोत, बबलू शेख, अभिजित पाटील, सुरेश पाटील, अमित धनवडे, उद्योजक गोशिमा अध्यक्ष सुरजित पोवार, लक्ष्मीदास पटेल, अजित आजरी, मोहन मुल्हेरकर, उदय दुधाणे, श्रीधर पोतनिस, आर. पी. पाटील आदी उपस्थित होते.

Related posts: