|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दहा कोटींची कामे अडकल्याने संतप्त नगरसेवकांनी स्थायी रोखली

दहा कोटींची कामे अडकल्याने संतप्त नगरसेवकांनी स्थायी रोखली 

प्रतिनिधी/ सांगली

मार्चपूर्वी प्रत्येक सदस्यांसाठी 25 लाखाच्या मंजूर कामाला निधीची तरतूद केली नसल्याने स्थायीत सदस्यांनी संताप व्यक्त करून अधिकाऱयांना धारेवर धरले. यावरून तब्बल दोन तास सभा तहकुब करण्यात आली. यासाठीचा लागणारा दहा कोटी इतक्या निधीची इतर हेडमधून तबदिल करून निधी उपलब्ध करून देण्याचा आदेश सभापतींनी यावेळी दिला.

सभापती सौ. संगीता हारगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मनपाच्या सभागृहामध्ये स्थायी समितीची बैठक झाली. 31 मार्चपूर्वी प्रत्येक सदस्याला 25 लाखांप्रमाणे 25 कोटींची कामे बजेटमध्ये धरून मंजूरही केली होती. मात्र, या कामाचा निधी री-ऑडीटमध्ये दुसऱया कामाच्या बिलासाठी वापरल्याने यातील सुमारे दहा कोटीची कामे अद्याप सुरू नाहीत. याबाबत मागील महिन्यात झालेल्या स्थायीमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता मात्र कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे आजच्या स्थायी पुन्हा सदस्य संतप्त झाले. हा निधी इतर हेडमधून देण्याचे आश्वासन दिले होते. तो निधी दिला नाही.

कामे मंजुर करून त्याचे टेंडरही काढले, निधीअभावी कामे सुरू करता येत नाहीत, वॉर्डात नागरिकांतून कामाबाबत विचारणा केली जात आहे, असा सवाल करीत या निधीचे काय झाले याचा खुलासा होईपर्यंत सभा तहकुब ठेवण्याची मागणी दिलीप पाटील, शिवराज बोळाज, निर्मला जगदाळे, प्रियांका बंडगर, सुनिता पाटील आदी नगरसेवकांनी केला.

सदस्यांचा आक्रमपणा बघून सभापती हारगे यांनी सभा दोन तासासाठी तहकुब केली. यानंतर पुन्हा सभा सुरू झाली. मात्र लेखाधिकारी नवीन असल्याने त्यांना याबाबत अधिक माहिती देता आली नाही. सभापतींनी मागील कामांसाठी लागणारा निधी दुसऱया हेडमधून उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला. पूर परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी फायबर बोटींची गरज असून महापालिकेने इंजिनसह सुमारे नऊ लाख 51 हजार 998 रूपयेच्या बोटी खरेदीला स्थायीत मान्यता देण्यात आली.

मनपा प्रसुतीगृह व कुटुंब नियोजन, केंद्रासाठी औषधे सर्जिकल, केमिकल्स, स्टेशनरी, याशिवाय मनपाच्या वैदयकीय केंद्रासाठी आयुर्वेदीक औषधे खरेदीसाठी साडेपाच लाखाचे औषध घेणे, मिरज विभागासाठी आठ लाख 57 हजाराचे नवीन सक्शन व्हॅन खरेदी करणे, कुपवाड वॉर्ड सहामधील कापसे प्लॉट, येरळा प्रोजेक्ट परिसर, अवधूत कॉलनी, रूक्मिणी नगर पाटील मळा परिसरामध्ये पाणीपुरवठा होण्यासाठी शिवनेरीनगर येथील जुनी पाईपलाईन बदलण्याच्या 16 लाख 29 हजाराच्या कामाला मंजुरी, वॉर्ड 18 मधील पेठभाग येथील भाजीमंडई 15 लाख 87 हजाराच्या अंतर्गत डांबरीकरण करणे, वॉर्ड 37 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते कत्तलखाना चौक शंभर फुटी रस्त्यापर्यंतच्या आरसीसी गटार करण्याच्या 93 लाख आठ हजाराचे काम करणे, मनपा क्षेत्रात दैनंदिन परवाना वसुली ठेका देणे आदी विषयाला स्थायीने मंजुरी दिली.