|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सरकारडून सहकार्य मिळत असेल तर पाठिंबा देण्यात गैर काय

सरकारडून सहकार्य मिळत असेल तर पाठिंबा देण्यात गैर काय 

प्रतिनिधी/ मडगाव

दाबोळी विमानतळ कायम ठेवण्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. तसा लेखी पुरावा आपल्याला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे. शिवाय दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱयाच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आश्वासन पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांनी दिले आहे. त्यामुळे सरकारला पाठिंबा देण्यात गैर काय आहे असे म्हणत आमदार चर्चिल आलेमाव यांनी सरकारला दिलेल्या पाठिंब्याचे समर्थन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी सुरवातीलाच मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दर्शविला होता. तेव्हा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यावर कारवाई करण्याची भाषा सुरू केली होती. पण, प्रत्यक्षात कारवाई करणे मात्र पक्षाला शक्य झाले नव्हते. हल्लीच झालेल्या राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीत देखील चर्चिल आलेमाव यांनी रामनाथ कोविंद यांना मतदान करून उघडरित्या सरकारला पाठिंबा दर्शविला होता.

मंगळवारी गोवा फॉरवर्डने बाबुश मोन्सेरात यांना पक्षात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर काल चर्चिल आलेमाव यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपण सुद्धा सरकार सोबत असल्यावर शिक्का मोर्तब केले. यासाठी त्यांनी सरकारडून आपल्याला सहकार्य मिळत असल्याचे कारण पुढे केले.

मोपा विमानतळ झाला तरी त्याचा दाबोळीवर काहीच परिणाम होणार नाही. दाबोळी कायम रहाणार असल्याचा लेखी पुरावा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला दिला आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यावर आत्ता काही परिणाम होणार नाही. तसेच पर्यटनाच्या वाढीसाठी दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱयावर सुविधा उपलब्ध केल्या जातील तसेच स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांनी दिले आहे. त्यामुळे या सरकारला आपला पाठिंबा कायम असेल असे चर्चिल आलेमाव म्हणाले.

टेक्सीसाठी स्पीड गव्हर्नर नको

गोव्यातील रस्त्याचे आत्ता रूंदीकरण होत आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील लोक सहज मोपा विमानतळावर जाऊ शकतील अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर देत आहेत. तरी सुद्धा टेक्सींसाठी स्पीड गव्हर्नर सक्तीचे करू नये, टेक्सीसाठी स्पीड गव्हर्नरचे बंधन असू नये असे मत चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले.

टेक्सींना स्पीड गव्हर्नर बसविले तर वेगावर मर्यादा येतील असे मत त्यांनी मांडले. उद्या रस्त्यात कुठे तरी अडथळे आले तर मोपाला पोचण्यास विलंब लागू शकतो, त्यामुळे लोकांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याने टेक्सीसाठी स्पीड गर्व्हनर असूच नये अशी मागणी त्यांनी केली.

Related posts: