|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात आढळतात अनेक प्रजातीचे साप

गोव्यात आढळतात अनेक प्रजातीचे साप 

नारायण गावस / पणजी

गोवा राज्य हे पश्चिम घाटाच्या कुशीत वसल्याने तसेच वाघेरी डोंगराच्या पायथ्याशी असल्याने गोव्यात अनेक प्रजातीचे पक्षी प्राणी आपल्याला सापडतात. या प्रमाणे सरपटणाऱया प्रजातींचे वेगवेगळय़ा जाती गोव्यात आढळून येतात. राज्यातील म्हादई अभयारण्य, चोर्ला घाट परिसर, खोतीगाव अभयारण्य, महावीर अभयारण्य, बोंडला अभयारण्यात अनेक प्रजातीचे प्राणी आहेत.  म्हादईच्या खोऱयात अनेक प्रजातीचे विषारी, बिनविषारी साप व उडता सापही आढळून आला आहे. मागील काही वर्षात ऍनमिल रेस्क्यू टिमने लोकवस्तीत घुसलेल्या अनेक प्रजातींच्या सापांना जीवदान दिले आहे.

गोव्यात आढळतात अनेक प्रजातीचे साप

 गोव्याच्या अभयारण्यामध्ये अनेक प्रजातीची साप आढळून आले आहेत. राज्यात आढळून आलेल्या विषारी सापामध्ये नाग, नागराज (किंगकोब्रा) मण्यार, फुरसे, घोणस, चाफडे व कॅस्टोर्ड पावळा हे साप आहेत. तसेच काही समुद्र विषारी साप गोव्यात आढळून आले आहेत. तसेच निमविषारी सापही काही गोव्यात आहेत. त्यांचे दात विषारी नसतात पण त्यांच्या लाळेमध्ये काही प्रमाणात विष आढळून येते. त्याचे प्रकार म्हणजे हरयाळी, सर्पवेळी, मांजऱया साप व त्यांचे प्रजाती, उडता साप, श्वानमुखी साप हे साप गोव्यात आढळून आले आहेत. तर बिनविषारीचे सुमारे तीस प्रजातीचे साप गोव्यात आढळून आले आहेत. यात धामण, अजगर, कवळय़ासाप, नानाटी, पट्टेरी कुकरी, रुकासाप व त्यांचे प्रजाती, हेवाळे, माणूल, खापर खवळय़ा, जवाळी साप, गवत्या साप, काळतोंडय़ा असे अनेक प्रजातीचे साप गोव्यात आढळतात.

किंगकोब्राचे लोकवस्तीत घुसण्याचे प्रमाण वाढले.

rकिंग कोब्रा या विषारी सापाचे लोकवस्तीत घुसण्याचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. ऍनिमल रेस्क्यू टिमच्या नुसार गेल्या दोन वर्षात लोकवस्ती घुसलेल्या सुमारे 16 किंग कोब्रांना पकडून त्यांना जंगलात सोडले आहे. मोठय़ा प्रमाणात जंगलतोड होत असल्याने त्यांचा अधिवास संकटात आला आहे. तसेच त्यांचे मुख्य खाणे असलेले धामण हा सापही लोकवस्तीत आढळत असल्याने त्यांना खाण्यासाठी हे किंगकोब्रा लोकवस्तीत घुसत असतात. सत्तरीतील हिवरे या गावात  सर्वात मोठा म्हणजे 15 फुट लांबीचा किंग कोब्रा पकडण्यात आला होता. यातील सत्तरीतील काजू बागायतीमध्ये मोठय़ा प्रमाणात किंग कोब्रा सापडले आहेत.

रस्त्यावर चिरडले जातात साप

सध्या सापांना लोकांकडून मारण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. सर्पमित्रांनी अनेक सापांना जीवदान दिले आहे. पूर्वी लोक दिसला साप की हाणा काठी असा प्रकार हेता. आता लोकही या सापांना न मारता त्यांना सर्प मित्रांच्या स्वाधीन करणे पसंत करतात. जरी सापांना जीवदान दिले जाते तरी मोठय़ा प्रमाणात साप हे गाडीच्या चाकाखाली सापडून मरण पावतात. पावसाळय़ात उब घेण्यासाठी साप रस्त्यावर येतात. अशा वेळी साप गाडीच्या चाकाखाली येऊन चिरडले जातात. असे अनेक साप आम्हाला रस्त्यावर मरुन पडलेले आढळतात. काही वर्षात गाडय़ांची संख्या वाढल्याने रस्त्यावर सापांना मोठय़ा प्रमाणात चिरडले गेले आहे.

पर्यावरणाचा घटक  साप

गोव्यात लोकवस्तीचे प्रणात झपाटय़ाने वाढत आहे., त्यामुळे सापांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. अनेक प्रजातीचे साप आज कमी होते चालले आहे. साप हे आपल्या पर्यावरणाचे घटक असून त्यांचे या पर्यावरणाशी संबध आहे. रोग निर्माण करणाऱया किटकांचे हे साप भक्षण करत असतात. तसेच शेतात किटक उंदीर खाण्याचे कामही हे साप करतात. आजही देशात विषारी सापचे विष काढून चोरटय़ा मार्गे बाजारात विकले जाते.आज नागपंचमीच्या दिवसानिमीत्त तरी त्यांचे महत्त्व आम्ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आमच्या हिंदू धर्मात आहे. सापाला एक प्रकारे आम्ही देवाचा दर्जा देतो. कारण या सापांचे या पर्यावरणाशी नाते आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्यांचे कार्य अनमोल आहे, असे यावेळी सर्पमित्र अमृतसिंह यांनी सांगितले

Related posts: