|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यातील ‘हज’ यात्रेकरू सुखरूप मदिनाला पोचले

गोव्यातील ‘हज’ यात्रेकरू सुखरूप मदिनाला पोचले 

प्रतिनिधी/ मडगाव

गोवा व कर्नाटक असे मिळून गोव्यातून 656 हज यात्रेकरू दोन विमानांनी मदिनाला गेले असून ते सुखरूप पोचल्याची माहिती गोवा हज यात्रेकरू संघटणेचे अध्यक्ष शेख जीना यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवार दि. 24 रोजी गोव्याच्या यात्रेकरूना घेऊन पहिले विमान मदिनाला उतरले.  

गोव्यातून यंदा 183 हज यात्रेकरू मदिनाला गेले आहेत तर उर्वरित यात्रेकरू हे बेळगाव, हुबळी, धारवाड परिसरातील आहे. यंदा सर्व यात्रेकरूच्या मुक्कामाची उत्तम सोय झाली. कुणाचीच तक्रार पुढे आली नाही. यात्रेकरूची गैरसोय होऊ नये यासाठी स्वंयसेवक उपलब्ध करण्यात आले होते. त्याच बरोबर सरकार पातळीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, मंत्री विजय सरदेसाई, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार ऍलिना साल्ढाना याचे सहकार्य मिळाल्याची माहिती देण्यात आली.

संपूर्ण भारतातून गोव्याच्या यात्रेकरूना मदिनाला प्रथम पोचण्याची व्यवस्था करण्यासाठी मनोहर पर्रीकर व खा. नरेंद्र सावईकर यांनी पुढाकार घेतला होता. केंद्रीयमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे बोलणी करून तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षी व यंदा गोव्याचेच यात्रेकरू सर्वप्रथम मदिनाला पोचल्याचे शेख जीना यांनी सांगितले.

यंदा हज यात्रेकरूना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी बेळगावहून खास मौलाना आमंत्रित केले होते. त्यांनी हज यात्रेकरूना मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन मदिना येथील हज यात्रेवेळी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले. यंदा हज यात्रेकरूना निरोप देण्यासाठी सुमारे आठ हजार लोकांनी उपस्थिती लावली होती. कर्नाटकातून आलेल्या हज यात्रेकरू सोबत त्यांचे नातेवाईक मोठय़ा संख्येने आले होते. ‘हज यात्रे’वर जाणे याला कर्नाटक प्रचंड महत्व दिले जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली.

गेल्या वर्षी खर्चाचा तपशील व्यवस्थित सादर झाला नाही

गेल्या वर्षी खर्चाचा तपशील व्यवस्थित सादर झाला नाही. त्यामुळे सरकारकडून निधी मिळविताना अडचणी निर्माण झाल्या. पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याकामी सहकार्य केले. यंदा सरकारकडून हज यात्रेकरूसाठी 20 लाख रूपये मंजूर झाले आहे. जर खर्चाचा तपशील वाढला तर आणखीन पाच लाख रूपये वाढ देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सरकारला यंदा खर्चाचा तपशील व्यवस्थितरित्या सादर केला जाईल, त्यानंतरच हा निधी मिळणार असल्याचे शेख जीना म्हणाले. यंदा हज यात्रेकरूसाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. या पूर्वी अशा सुविधा उपलब्ध झालेल्या नव्हत्या. विमानतळाचे संचालक, इमिग्रेशन विभाग, डॉक्टर, पोलीस, कस्टम याचे पूर्ण सहकार्य मिळाल्यानेच कोणत्याच समस्या उदभवल्या नसल्याचे सांगण्यात आले.

Related posts: