|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘युगपुरुष-महात्माचे महात्मा’ नाटकाचा आज प्रयोग

‘युगपुरुष-महात्माचे महात्मा’ नाटकाचा आज प्रयोग 

प्रतिनिधी/ पणजी

‘युगपुरुष-महात्माचे महात्मा’ या नाटकाचा विशेष प्रयोग 27 रोजी रात्री 8 वाजता कला अकादमी, पणजी येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, पणजी महापालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो आणि अन्य विशेष अतिथींच्या उपस्थितीत सादर करण्यात येणार आहे. हे नाटक श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे सादर करण्यात येणार आहे.

युगपुरुष हे नाटक भारताच्या इतिहासातील अशी कहाणी आहे की ज्यामुळे मोहनदास गांधी महात्मा कसे आणि कोणामुळे झाले याची उकल करणारी ही नाटय़कृती असून भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीला एक नवीन परिमाण, सामाजिकदृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देणारी ठरली आहे.

आतापर्यंत या नाटकाचे 700 प्रयोग झाले असून प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल ठरला आहे. महात्मा गांधी आणि श्रीमद् राजचंद्रजी या दोन व्यक्तिमत्त्वांनी अवघ्या विश्वाला सत्य आणि अहिंसेच्या सनातन सिद्धांताचा परिचय करून दिला आणि बॅरिस्टर मोहनदास गांधी यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडले याचे दर्शन या नाटकात होणार आहे.

मोहनदास ते महात्मा गांधी हा गांधीजींचा जीवन प्रवास या नाटकातून मांडला गेला आहे. या नाटकाचा प्रेक्षक सदर प्रवासाचा साक्षीदार होतो तेव्हा तो केवळ मोहित होत नाही तर त्याच्या संवेदना जागृत होतात. एवढय़ा समर्थपणे ही नाटय़कृती सादर करण्यात येत असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

या नाटकाद्वारे मिळणारे उत्पन्न दक्षिण गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात 200 बिछान्यांचे एक आधुनिक रुग्णालय उभारणीसाठी वापरण्यात येत आहे. दक्षिण गुजरातमधील आदिवासी जातीला आर्थिक मदत व मागासवर्गाला आणि ग्रामस्थांना या सेवेचा लाभ होईल.

श्रीमद राजचंद्रजी यांचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. यानिमित्त श्रीमद राजचंद्रजी यांचे परमभक्त तथा श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेव श्री राकेशभाई यांच्या प्रेरणेने या नाटकाचे निर्माण केले गेले आहे. दीडशेवा जयंती समारोह पूर्ण वर्षभर साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत ही निर्मिती आहे.

उत्तम गज लिखित आणि राजेश जोशी यांच्या द्वारे दिग्दर्शित, संगीतकार सचिन-जिगर या जोडीने संगीतबद्ध केलेले ‘युगपुरुष’ म्हणजे उत्तम कथा, हृदयस्पर्शी दिग्दर्शन, धारदार संवाद, प्रेरक प्रसंग, अद्भूत सजावट आणि कलाकारांच्या अद्भूत अभिनयाची अभिव्यक्ती आहे.

Related posts: