|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आता अर्भकांवरील धोका टाळणे शक्य

आता अर्भकांवरील धोका टाळणे शक्य 

महेश कोनेकर/ मडगाव

लग्नानंतर बाळाच्या आगमनाची चाहूल लागली की, घरात एक प्रकारचा उत्साह व आनंदी वातावरण असते… आपले मुल व्यवस्थित जन्माला यावे, यासाठी पालक सर्व प्रकारची काळजी घेतात, तरीसुद्धा बऱयाच वेळा समस्या निर्माण होतात. त्यात जुळी मुले असल्यास जास्त काळजी घ्यावी लागते. जुळय़ा मुलांमध्ये अनेक दोष असतात पण आता लंडनमध्ये झालेल्या संशोधनात आईच्या गर्भातच मुलांच्या वाढीचा अचुक अंदाज घेणे शक्य झाले आहे. ही जगातील पहिली वहिली चाचणी गोमंतकीय कन्या माला किरण वस्त धुरी हिच्यावर यशस्वीरित्या करण्यात आली आहे.

मातेच्या गर्भातच मुलांची वाढ कशा पद्धतीने होते, त्यांच्यात काही दोष आहे का हे शोधून काढण्यासाठी नवीन गर्भधारणा स्कॅनिंग उपकरण विकसित करण्यात आले आहे. जगात प्रथमच संशोधन झालेल्या या उपकरणाची दखल जगातील आघाडीची वृत्त वाहिनी ‘बीबीसी’ तसेच लंडनमधील ‘आयटीव्ही’ने घेतली आहे. शिवाय ‘मिरर’ व ‘वैंडसवर्थ गार्डियन’ या दैनिकांनी देखील ठळक प्रसिद्धी दिली आहे.  माला किरण वस्त धुरी यांना जुळी मुले होणार असून योगायोग असा की, आजच त्या दोन मुलांची आई होत आहे. त्यांच्यावर दक्षिण लंडनमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सिझेरियन केले जाणार आहे.

लंडनमध्ये झाली यशस्वी चाचणी

दक्षिण लंडनमधील सहा हॉस्पिटलातील 3000 हजार गरोदर महिलांचा डेटा तयार करण्यात आला. त्यातून नवीन गर्भधारणा स्कॅनिंग उपकरण विकसित करण्यात आले. या उपकरणाची पहिलीवहिली चाचणी सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या प्रसुती शास्त्रातील तज्ञ डॉक्टर अस्मा खलील यांनी घेतली. हे नवीन गर्भधारणा स्कॅनिंग उपकरण विकसित करण्यासाठी ‘ट्विन्स ऍन्ड मल्टिपल बर्थस् असोसिएशन’ (तांबा) यांनी पुढाकार घेतला. ज्यांना जुळी मुले होणार अशा पालकांकडून त्यासाठी निधी उभा करण्यात आला. जगभरातून त्याला प्रतिसाद मिळाल्याची माहिती तांबाने दिली आहे.

हजारो जुळय़ांचे वाचणार प्राण

आतापर्यंत आईच्या गर्भात असलेल्या एकेरी (सिंगल) मुलांची स्कॅनिंग उपकरणाद्वारे चाचणी घेतली जायची. पण, आता दुहेरी (ट्विन्स) मुलं असल्यास नव्या स्कॅनिंग उपकरणाद्वारे चार्ट घेतला जाणार आहे. या चार्टद्वारे मुलांची कशापद्धतीने वाढ हेतेय, याची माहिती डॉक्टरांना मिळेलच, शिवाय आई-वडिलांना देखील मिळणार आहे. या नव्या स्कॅनिंग उपकरणामुळे आता वर्षाला हजारो ट्विन्स बालकांचा जीव वाचविणे शक्य होईल. तसेच सर्वोत्तम उपचार करणे शक्य होईल असा विश्वास ‘तांबा’चे सीईओ कॅथ रिड यांनी व्यक्त केला आहे. हे संशोधन क्रांतीकारण ठरणार असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

नव्या उपकरणामुळे जगात क्रांति होणार : डॉ. अस्मा

माला वस्त धुरी यांच्यावर यशस्वी चाचणी घेतल्यानंतर डॉ. अस्मा खलील आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हणाल्या की, ‘वैद्यकीय इतिहासातील हा महत्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे’. त्या पुढे म्हणाल्या की, आईच्या गर्भात जुळय़ा मुलांची वाढ कशा पद्धतीने होते याचे निधान करणे या पूर्वी खुपच कठीण जात होते. कारण दोन मुले असल्याने ती एकदमच लहान असायची. एका मुलाची वाढ कशी होते, याची माहिती व्यवस्थित मिळत होती. पण, जुळय़ा मुलांसंदर्भात अचुक माहिती उपलब्ध होत नव्हती. पण, नव्या गर्भधारणा स्कॅनिंग उपकरणामुळे निश्चितच क्रांति होईल, असे त्या म्हणाल्या..

आपल्यासाठी हा आनंदाचा क्षण : माला

आज दोन मुलांची माता होत असलेल्या माला किरण वस्त धुरी यांनी या चाचणीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, आपल्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. जगातील पहिल्यावहिल्या ‘नव्या गर्भधारणा स्कॅनिंग उपकरणा’ची चाचणी आपल्यावर झाली याची नोंद कायम ठेवली जाणार आहे.

खास ‘ट्विन्स’चा चार्ट घेण्यासाठी हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. वास्तविक अशी चाचणी देणे म्हणजे आपल्या खाजगी जीवनावर प्रकाश टाकण्याचाच भाग बनतो. पण, सेंट जॉर्ज हॉस्पिटलातच सेवा देणाऱया गोमंतकीय कन्येने स्वतःवर चाचणी घेण्याची मान्यता देताना एक प्रकारचे हे धाडसच केले असे म्हणावे लागेल. ज्याची दखल लंडनमधील ‘बीबीसी’ व ‘मिरर’ सारख्या प्रसार माध्यमांनी घेतली आहे.

Related posts: