|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विद्यार्थी अन् एकच शिक्षिका

विद्यार्थी अन् एकच शिक्षिका 

प्रतिनिधी/ फोंडा

चार वर्ग, 44 विद्यार्थी आणि केवळ एक पूर्णवेळ शिक्षिका. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणारी नुकसानी पाहून हतबल झालेले पालक मागील दीड महिना फोंडा भागशिक्षणाधिकारी आणि शिक्षण खात्यामध्ये हेलपाटे मारीत आहेत. शिक्षण खाते मात्र त्यांना हा शिक्षक पुरविण्याच्या आश्वासना पलिकडे काहीही देऊ शकलेले नाही. फोंडा तालुक्यातील तांबडी कुर्टी सरकारी प्राथमिक शाळेची ही व्यथा आहे.

 या शाळेत रायत कुर्टी व पिसगाळ प्रियोळ भागातील मिळून साधारण 44 मुले शिकत आहेत. एक पूर्णवेळ व एक अर्धवेळ अशा दोन शिक्षिका चार वर्गांचा भार पेलीत आहेत. वास्तविक या शाळेला आणखी एका पूर्णवेळ शिक्षकाची गरज आहे.

 अधिकाऱयांकडून मिळतेय केवळ आश्वासन

 पालकांनी मागील दीड महिना फोंडा भागशिक्षणाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले. पालकांनी किमान पन्नास हेलपाटे मारुनही अधिकाऱयांनी या गोष्टीचा पाठपुरावा केलेला नाही. शिक्षक नेमण्याच्याबाबतीत काहीच प्रगती झालेली नसली तरी अधिकारी आश्वासन देण्यात मात्र कुठेच कमी पडत नाहीत. शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांचीही भेट घेऊन अजून एक शिक्षक नेमण्याची मागणी केली. मात्र आठवडय़ाभरात शिक्षकाची नेमणूक करण्याचे शिक्षण खात्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही.

   मराठी शाळा बंद पाडण्याचे कारस्थान तर नाही?

या भागातील पालकांनी आपल्या मुलांना जवळच्या केजीमध्ये न पाठविता मराठी शाळेतच पाठविण्याचा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे या शाळेची पटसंख्याही इतर शाळांच्या तुलनेत चांगली आहे. पण शिक्षण खाते त्यांना आवश्यक असलेला एक शिक्षक अद्याप पुरवू शकलेले नाही. याबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चांगली मराठी शाळा बंद पाडण्याचे कारस्थान तर रचले जात नाही ना, अशी गंभीर चर्चा या भागात सध्या सुरु आहे.

फोंडा तालुक्यात पटसंख्येबरोबरच चांगले शिक्षण व इतर उपक्रमांमध्ये ही शाळा अग्रेसर आहे. तरीही शिक्षण खात्याच्या वेळकाढू धोरणामुळे या शाळेतील मुलांवर अन्याय होत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया पालक शिक्षक संघाने व्यक्त केली आहे. चार वर्गांचा भार एकाच शिक्षिकेवर पडत असून इंग्रजी शिकवणारी दुसरी शिक्षिका केवळ तीन दिवस या शाळेत येते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे नुकसान तर होतेच, शिवाय कार्यालयीन बैठका व इतर कामाच्यावेळी मुख्य शिक्षिकेला शाळा बंद ठेवावी लागते. मागील दीड महिना शिक्षण खात्याकडे विनवण्या करणाऱया पालकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या आठवडय़ाभरात शाळेत पूर्णवेळ शिक्षिकेची नेमणूक न झाल्यास मुलांची नावे काढून टाकण्याचा इशारा दिला आहे.

Related posts: