|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित

निपाणी मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित 

वार्ताहर / निपाणी

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तेच राज्यातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकार मात्र विविध विकास योजना राबवून लोकाभिमुख बनले आहे. 2018 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. विकासकामांच्या माध्यमातून राज्यात काँग्रेसच्या पाठीशी जनमत ठाम आहे. यावरून राज्यात काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यात कोणतीही अडचण नाही. बेळगाव जिल्हय़ातील सर्वाधिक जागा काँग्रेसच्या येतील. तसेच निपाणी मतदारसंघातील विजयही निश्चित आहे. पण बुथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागा, असे आवाहन कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष एस. आर. पाटील यांनी केले.

येथील मराठा मंडळ सांस्कृतिक कार्यालयात बुधवारी निपाणी विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.  बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप जाधव यांनी स्वागत केले. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ऍपेक्स बँकेचे संचालक लक्ष्मणराव चिंगळे यांनी करत, ईस्ट इंडिया कंपनीला मतदारसंघाबाहेर पाठवा, असे सांगितले.

एस. आर. पाटील पुढे म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनी देश स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्वधर्मसमभाव असा संदेश देणारा काँग्रेस पक्ष आहे. केंद्रातील सध्याच्या भाजपा सरकारने देशवासियांना भूलथापा मारण्याचा चंग बांधला आहे. सत्तेत येताच वर्षभरात प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करतो असे भाजपाचे आश्वासन हवेत विरले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने मात्र जनसामान्यांना दिलासा देणाऱया योजना राबविल्या आहेत. या योजनांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा. काँग्रेसचा विजयी रथ कोणीही रोखू शकणार नाही, असे सांगितले.

काँग्रेसच्या योजनांची माहिती घराघरात पोहोचवा

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव मनिकम टॅगोर म्हणाले, निपाणी विधानसभा मतदारसंघात एकूण 217 बुथ आहेत. बुथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आपआपल्या बुथमध्ये मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. राज्यात इतरत्र काय सुरू आहे याकडे लक्ष देत वेळ घालवू नये. बुथअंतर्गत येणाऱया घराघरात पोहोचताना केंद्रातील मोदी सरकारचे अपयश, राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राबविलेल्या विकास योजना व देशात मुख्यमंत्री पदावर असताना भ्रष्टाचारातून जेलमध्ये गेलेले येडियुराप्पा व निष्कलंक सेवा देणाऱया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा कार्यकाळ पटवून द्या, असे सांगितले.

विजयासाठी एकीची वज्रमुठ बांधा

केपीसीसीचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत जिवाचे रान करून राबण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने राबविलेल्या विकास योजना, शेतकऱयांना दिलेली कर्जमाफी यावर चर्चा करायला कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. मतदारसंघात विरोधकांना मंत्री होण्याची स्वप्ने पडत आहेत. पण त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. निपाणी नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. काही नगरसेवक विरोधात गेले असतील पण तेही लवकरच परत येतील. वैयक्तीक मतभेद बाजूला ठेवा व काँग्रेसच्या विजयासाठी एकीची मूठ बांधा, असे सांगितले.

उमेदवाराच्या पाठिशी ठाम रहा

माजी आमदार काका पाटील म्हणाले, 2013 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. तो पराभव माझा होता, काँग्रेस पक्षाचा नव्हता. भाजपा हा विजय आपला म्हणत असले तरी तो विजय हा भाजपा-निजद युतीचा होता. आपण आमदार असताना विविध विकासकामे केली ती शाश्वत आहेत. यामध्ये काळम्मावाडी करार, मतदारसंघाचे अस्तित्व, तालुका निर्मिती यासह विविध पूल, बंधारे, गावांना जोडणारे रस्ते, बहुग्राम पाणी योजना, निपाणीत 24 तास पाणी योजना अशा अनेक विकासकामांचा समावेश आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत पक्ष जो निर्णय घेईल, जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार सर्वांनी करावा व विजय हे एकच ध्येय डोळय़ासमोर ठेवावे, असे सांगितले.

Related posts: