|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोदींचा काळा पैसा कुठे आहे ?

मोदींचा काळा पैसा कुठे आहे ? 

प्रतिनिधी / संकेश्वर

लोकसभा निवडणुकीत भारतातील काळापैसा बाहेर काढणार असल्याची हमी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापी त्या काळय़ा पैशावर बोलती बंद केली असून कुठे आहे तो काळा पैसा? असा सवाल काँग्रेस पक्षाचे बेळगाव विभागाचे प्रभारी माणिक ठाकुर यांनी उपस्थित केला. अपयशी ठरलेल्या केंद्रातील भाजपला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

बुधवारी येथील नेसरी डिलक्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अमरनाथ यात्रेत दहशतवाद्यांनी 7 भाविकांना ठार मारले. यात्रेवरील हल्ल्याची घटना देशाच्या इतिहासात पहिलीच आहे. यावरून देशाचे संरक्षण खाते किती दुबळे आहे हे स्पष्ट होते. भाजपने कर्नाटकात जो मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा स्पष्ट केला आहे. ते येडियुराप्पा भ्रष्टाचारी असून त्यांनी कारावास भोगला आहे. ते राज्याला काय चांगले भविष्य देणार अशी खंतही ठाकुर यांनी व्यक्त केली.

आगामी विधानसभा आपण सहज जिंकणार

राज्यात सिद्धरामय्या सरकार अन्नभाग्य योजना राबवित आहे. या शिवाय शेतकऱयांचे 50 हजारापर्यंतचे कर्ज माफ करून नवा इतिहास रचला आहे. तेव्हा हुक्केरी मतदारसंघातील 201 बुथमध्ये काँग्रेस उमेदवाराला आघाडी दिली तर आगामी विधानसभा आपण सहजपणे जिंकू यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन यावेळी ठाकुर यांनी केले.

बॉक्स करणे

उमेश कत्तींना काँग्रेसपासून लांब ठेवणार

उमेश कत्ती काँग्रेस पक्षात येण्यास उत्सूक असून त्यांचा प्रवेश कोणत्याही परिस्थितीत नाकारला जावा असा ठराव आवाजी मताने या बैठकीत करण्यात आला. या ठरावाच्या प्रती पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी, कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ. परमेश्वर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बेळगाव विभागाचे काँग्रेस प्रभारी माणिक ठाकुर यांना देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी स्पष्ट करण्यात आली.

120 आश्वासनाची पूर्तता

सन 2013 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 165 आश्वासने जाहीरनाम्यातून दिली होती. गत चार वर्षांत सत्तेवर आलेल्या काँग्रेस प्रणित सिद्धरामय्या सरकारने 120 आश्वासनांची पूर्तता करण्यात यशस्वी झाले आहे. या शिवाय राज्यात पाणीपुरवठा योजनेवर अधिकचा भर देऊन शेतकऱयांचे बारामाही शेती फुलविण्याचे काम केले आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी काँग्रेसशी संघटीत राहून आगामी विधानसभेत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन राज्याचे काँग्रेस कार्याध्यक्ष एस. आर. पाटील यांनी केले.

काँग्रेस नेत्यांचा त्याग

काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे, त्यागातून या पक्षाने देशाला चांगले प्रशासन देण्याचे काम केले आहे. ब्रिटिशांना हाकलून लावणारा एकमेव पक्ष काँग्रेस असून आज, संगणक, मोबाईल, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास पाहातोय ते काँग्रेसमुळेच हे विसरून चालणार नाही. सोशल मिडियाच्या आधारावर फुकटच्या प्रसिद्धीत झुलणाऱया भाजपला कोणत्या त्यागाचा इतिहास आहे दाखवावे, असा सवाल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, कृषी, उद्योग व बँकेचे राष्ट्रीयीकरण करून समाजातील सर्व घटकांना सन्मानाने जगण्याचे बळ काँग्रेसने दिले आहे. तेव्हा काँग्रेसच्या इतिहासाचे महत्त्व मतदारांना पटवून देत काँग्रेसचा प्रचार करा, असे आवाहन यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी विधानपरिषद सदस्य वीराण्णा मत्तिकट्टी, राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांचीही भाषणे झाली. प्रारंभी हुक्केरी विभागाचे काँग्रेस अध्यक्ष अशोक अंकलगी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर दिल्लीचे बेळगाव विभागाचे प्रभारी माणिक ठाकुर, कर्नाटकाचे राज्य काँग्रेस कार्याध्यक्ष एस. आर. पाटील, ए. बी. पाटील, राज्य काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलकट्टी, आमदार वीराण्णा मत्तिकट्टी, राज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर, केसीपी सदस्य जयप्रकाश नलवडे, गंगाधर मुडसी व ऍड. एस. आर. करोशी यांच्यासह संकेश्वर, हुक्केरीसह ग्रामीण भागातून हजारो कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

Related posts: