|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पर्यटनातील विदेशी ‘व्यक्ती आणि वल्ली’

पर्यटनातील विदेशी ‘व्यक्ती आणि वल्ली’ 

‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ ही म्हण सर्वश्रुत आहे. पर्यटन क्षेत्रात वावरताना गेल्या तीस वर्षांमध्ये त्याचा पुरेपूर अनुभव घेता आला. आपल्याकडे येणारे विदेशी पर्यटक मग ते कुठल्याही राष्ट्रातील असोत, त्यांना आपण ‘फॉरेनर्स’ म्हणून संबोधतो. मात्र या फॉरेनर्समधील वैशिष्टय़े, त्यांचे स्वभाव, खाण्यापिण्याच्या सवयी, आवडीनिवडी, चोखंदळपणा व एकंदरीत वर्तन याविषयी अनेक गोष्टी अनुभवता आल्या. त्यांना एखादा विषय समजावून सांगताना भाषा व संवादातील विसंगतीमुळे काही गमती-जमतीही घडल्या. फोंडा तालुक्यातील विविध स्पाईस फार्ममध्ये व्यवस्थापक म्हणून काम करताना विविध राष्ट्रांमधील पर्यटकांबद्दल जे पाहिले व जाणून घेतले, त्याबद्दल.

गोव्यात पहिले चार्टर विमान उतरले ते 1984 साली जर्मन पर्यटकांचे.  महायुद्धाची पार्श्वभूमी असलेला हा देश. त्यामुळे जर्मन पर्यटक सर्वांमध्ये फारसे मिसळत नाहीत. पर्यटक म्हणून ते भरपूर खर्च करतात. खाण्यापिण्यात आवडीनिवडी असलेले हे लोक खवय्ये नाहीत. त्यांचे बोलणेही मोजकेच असल्याने पर्यटन दौऱयात ते प्रश्नही फारसे विचारीत नाहीत. त्यांच्या एकंदरीत खाण्यातून भारतीय जेवण त्यांना फारसे रुचत नसल्याचे अनुभवास येते. जर्मन पर्यटकांच्या बिलकुल विरुद्ध इंग्लिश पर्यटक. दोन्ही राष्ट्रे युरोप खंडातील असली तरी त्यांच्यात व्यक्ती वैशिष्टय़ांमध्ये खूप अंतर आहे. इंग्लिश पर्यटक हा अत्यंत चोखंदळ व उत्साही. राजकीय विषय व इतिहासामध्ये आवड असलेला. खूप जाणून घेणारा, प्रश्न विचारणारा आणि तेवढाच चौकस. इंग्रजी भाषेमुळे गोव्यात उतरणाऱया इंग्लिश पर्यटकांना संवाद साधण्यात अडचण येत नाही. गोव्यावर युरोपियन लोकांची म्हणजे पोर्तुगीजांची सत्ता होती, त्यामुळे गोव्याचा इतिहास व संस्कृतीमध्ये या पर्यटकांना विशेष रुची दिसून येते. गोव्यातील मंदिरे व मंदिरांतील कलात्मकता त्यांना विशेष भावते. मंदिरातील शिल्पसौंदर्य मूर्तीच्या वैशिष्टय़ांपासून देवदेवतांच्या आकृत्या व तेथे चालणाऱया देवकार्यामधील अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टी जाणून घेण्यास इंग्लिश पर्यटकांना आवडते. इंग्लिश पर्यटक खूप बोलका असला तरी शिस्तप्रिय असल्याचे त्यांच्या एकंदरीत वर्तनातून दिसून येते. सावई प्लान्टेशनमध्ये असताना आम्ही इंग्लिश पर्यटकांना गावातील अनंत देवस्थानमध्ये घेऊन जायचो. या मंदिराच्या सभागृहात विष्णू अवताराच्या विविध आकृत्या आहेत. एका इंग्लिश पर्यटकाने नृसिंह अवताराकडे पाहून हा कोण, असे गाईडला उत्सुकतेने विचारले होते. गाईडने अगदी सहजपणे तो नृसिंह असल्याचे सांगितले.

गंमतीची गोष्ट म्हणजे,  त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरसिंह राव होते. या उत्साही पर्यटकाने अजिबात वेळ न दवडता ‘ओ प्राईम मिनिस्टर नरसिंहा’ असा उच्चार करीत आपल्या कॅमेऱयातून ती आकृती टिपलीही. नंतर मात्र त्याला या अवताराविषयी सविस्तर सांगावे लागले. इंग्लिश पर्यटक हे बहुतेक पेशाने शिक्षक किंवा कंपनी कामगार असतात. काही पत्रकारही त्यांच्यासोबत येतात. दौऱयावर येण्यापूर्वी भेटी देणाऱया स्थळांची सविस्तर माहिती घेऊनच ते येत असल्याने त्यांना चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास गाईड अडचणीत येऊ शकतो. गाईडने प्रामाणिकपणे आपल्याला या गोष्टीची माहिती नाही, असे सांगितल्यास ते समजू शकतात. खाण्यासंबंधी त्यांच्या फारशा आवडीनिवडी नसल्या तरी हलका आहार किंवा फळांना ते पसंती देतात.

स्केन्डोनेविया म्हणजेच फिनलँड, स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्क या चार राष्ट्रातील पर्यटकांची बरीच चार्टर विमाने गोव्यात आलेली आहे. सध्या हे पर्यटक कमी असले तरी मागील दहा बारा वर्षांमध्ये स्केन्डोनेवियाच्या पर्यटकांची गोव्यात रेलचेल असायची. त्यापैकी फिनलँडमधील पर्यटक हे स्थूल व खवय्ये आहेत. शाकाहारी किंवा मांसाहारी जेवण, त्यातही माशांपासून बनविलेले विविध पदार्थ ते आवडीने खातात. ते जसे भरपूर खातात तसेच वायफळ बडबडही करतात. विविध उत्पादनातील प्रक्रिया बघणे त्यांना आवडते. गोव्यात आल्यानंतर काजू उत्पादनावर होणारी प्रक्रिया ते मोठय़ा उत्सुकतेने बघायचे. काजूचे बोंड व त्याची बी म्हणजे काजूगर हा फळाच्या आत नसून बाहेर असतो ही त्यांच्यासाठी मोठी कुतूहलाची गोष्ट असायची. दिसायला अत्यंत सुंदर व रुबाबदार पर्यटक म्हणजे स्वीडीश. स्वीडनमधील हे लोक जेवढे टापटीप तेवढेच त्यांचे खाणे आणि बोलणेही अगदी शिस्तबद्ध. गोव्यातील विविध पदार्थ, त्यातही शाकाहारी पदार्थ त्यांना आवडतात. स्वीडन हा अगदी छोटा देश असून येथील लोक हे भित्र्या स्वभावाचे. त्यांच्या एकंदरीत वागण्यातून ते जाणवते. मात्र फिनलँड व स्वीडनपेक्षा नॉर्वेतील बरेचशे पर्यटक एकदम वेगळे व भन्नाट स्वभावाचे. त्यांना जेवण बनवायला आवडते. त्यामुळे स्पाईस फार्ममध्ये त्यांच्यासाठी किचनचा एक भाग मोकळा ठेवावा लागे. ते स्वत: पैसा खर्च करून विविध प्रकारचे पदार्थ कुकच्या मार्गदर्शनाखाली शिकून घेत. आपण तयार केलेले हे जेवण इतरांना पुरविण्यातही त्यांना मोठा आनंद वाटे. कुठलीही गोष्ट पाहण्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे ही त्यांची खासियत! एखादे संगीत आवडले तर ते वाद्य स्वत: वाजवून बघतील. डेन्मार्कमधील पर्यटक हे आर्थिकदृष्टय़ा श्रीमंत. अत्यंत कमी बोलणारे व तोंडावर फारसे हावभावही न दाखविणारे. मात्र मनाने चांगले. एखादी गोष्ट पटली तरच त्यात सहभागी होतील असा त्यांचा स्वभाव. पर्यटन दौऱयात खूप खर्च करणारे असे हे डेन्मार्कमधील पर्यटक शांत स्वभावाचे.

सध्या गोव्यात मोठय़ा प्रमाणात चार्टर विमानातून येणारे विदेशी पर्यटक म्हणजे रशियन. शरीराने हट्टेकट्टे आणि एकदम धीट. साम्यवाद व युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या पर्यटकांना मोठय़ा गोष्टी बघायला आवडतात. प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर गवा रेडा, हत्ती, पाणघोडा अशा प्राण्यामध्ये ते जास्त रमतात. खाण्यामध्ये त्यांना आवडीनिवडी लागत नाहीत. ऐतिहासिक वास्तूही बघताना भव्य वास्तूंविषयी त्यांना विशेष कुतूहल असते. विविध प्रकारचे पेहराव करायलाही त्यांना आवडते. या व्यतिरिक्त प्रेंच, पोर्तुगाल व इतर युरोपियन पर्यटक गोव्यात फार कमी येतात. प्रेंच पर्यटक चार्टरमधून न येता बहुतेक बोटीतून प्रवास करतात. ते दौऱयावर एकत्र गटातून येत नसल्याने त्यांच्याशी फारसा संपर्क येत नाही. अशा या पर्यटनातील व्यक्ती आणि वल्ली..!

Related posts: