|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एसटी बसेस, स्थानके होणार चकाचक

एसटी बसेस, स्थानके होणार चकाचक 

कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक व एसटी बसेसच्या स्वच्छतेबाबत अनेक प्रश्न असतात. खासगी बसेसच्या तुलनेत एसटीची स्वच्छता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे बसस्थानकांसह एसटी गाडय़ा कार्यालये चालक-वाहक विश्रांतीगृहे हे बहिस्थ संस्थेमार्फत ‘चकाचक’ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याअनुषंगाने येत्या तीन महिन्यांत कार्यवाही करण्यात येणार असून बहिस्थ संस्थेला दिलेले स्वच्छतेचे कामकाज नियमानुसार होतेय की नाही, हे पाहण्यासाठी ‘मोबाईल ऍप’ही विकसीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात एसटी बसेस चकाचक दिसतील, अशी अपेक्षा आहे.

एसटी बसेसची स्वच्छता अनेकदा होत नाही. परिणामी प्रवाशांना गाडय़ांमध्ये बसताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काहीवेळा बसस्थानकांवरही मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता असते. या साऱयाचा परिणाम प्रवाशांवर होतो. परिणामी एसटीकडे आकर्षित होणाऱया प्रवाशांची संख्या घटते. त्यामुळे गाडय़ांसह बसस्थानके स्वच्छ करण्याच्या अनुषंगाने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला आहे.

खासगी संस्थेला काम

एसटी महामंडळाची बसस्थानके, कार्यालये, चालक वाहक विश्रांतीगृहे व बसेस एकाच बहिस्थ (खासगी) संस्थेमार्फत स्वच्छ करण्याचा विचार महामंडळ पातळीवरून सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार कार्यवाहीलाही सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी विभाग पातळीवर हे काम देण्यात येत असे. मात्र, आता एकाच संस्थेला काम देण्याचा विचार महामंडळाने केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी या कंपनीच्या अधिकाऱयांसोबत एसटीचे अधिकारीही असणार असून संयुक्तरित्या यावर देखभाल होणार असल्याचे सांगण्यात आले.

गाडय़ा होतील चकाचक

राज्यस्तरावर एकाच संस्थेला काम देऊन त्यांच्यामार्फत स्वच्छ एसटी करण्यासाठीचा प्रयत्न करताना प्रथम एसटीच्या गाडय़ा चकाचक करण्यावरही भर देण्यात येणार आहे. बसस्थानकांवर मोठय़ा प्रमाणात घाण व अस्वच्छता असते. तसेच चालक-वाहक विश्रांतीगृहेही अस्वच्छ असल्याच्या तक्रारी सातत्याने संघटना पातळीवर होत असतात. या साऱयांवर यातून उपाय काढण्याचा प्रयत्न महामंडळाने केला आहे. येत्या तीन महिन्यांत याबाबतची कार्यवाही सुरू होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाईल ऍप

महामंडळाच्या पातळीवर केवळ एवढेच करून न थांबता आता स्वच्छतेबाबत होणाऱया या कार्यवाहीवर मोबाईल ऍपच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. ज्या ऍपच्या माध्यमातून गाडय़ा व एसटीच्या कानाकोपऱयातील स्वच्छतेचा आढावा मध्यवर्ती कार्यालयातून घेणे शक्य होणार असल्याची तरतूद या ऍपमध्ये असणार आहे. त्यामुळे गाडय़ा किंवा कार्यालये स्वच्छ न करता, तशी ठेवणे संबंधितांना महागात पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ही कार्यवाही सुरू झाल्यानंतर येत्या तीन महिन्यानंतर एसटी बसेस तसेच बसस्थानके आपणाला चकाचक दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गाडय़ांमधील स्वच्छतेला प्राधान्य दिल्यास मध्यमवर्गीय प्रवासीही एसटी बसेसच्या माध्यमातून प्रवास करण्यावर भर देऊ शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

Related posts: