|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विद्यार्थीदशेत भरपूर वाचन करा!

विद्यार्थीदशेत भरपूर वाचन करा! 

कडावल : सहजसोप्या आणि कमीत-कमी शब्दात मिश्किल आणि पौराणिक, ऐतिहासिक कथा सादर केल्या, तर रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. यासाठी विद्यार्थी दशेतच मुलांनी भरपूर वाचन, कथाकथन करून स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. आजच्या तंत्रज्ञान युगात टिकायचे असेल, तर कठोर परिश्रमांशिवाय पर्याय नाही, असे भडगाव हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषा पाटील यांनी कडावल वाचनालय येथे सांगितले.

कडावल वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आयोजित कथाकथन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. ‘तरुण भारत’चे प्रतिनिधी सुभाष मोरजकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भडगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर पवार, वाचनालयाचे सचिव संभाजी वळंजू, भडगाव हायस्कूलच्या शिक्षिका माधुरी खराडे, पांग्रड हायस्कूलचे शिक्षक श्यामराव बहिरम, अनुप्रिया राणे तसेच वाचनालय सदस्य नंदकिशोर मुंज, ग्रंथपाल दीक्षा परब, रश्मी मोरजकर आदी उपस्थित होते. वाचनालयाचे संस्थापक कै. एम. डी. सावंत यांनी ग्रामीण भागात सुरू केलेले वाचनालय आज चाळीस वर्षे कार्यरत आहे. कडावल पंचक्रोशी वाचनालय दरवर्षी कथाकथन, वक्तृत्व, निबंध लेखन असे विविध उपक्रम राबवित असते. यात भाग घेणाऱया विद्यार्थ्यांतून मनमिळावू व कष्टाळू वृत्ती, जिद्द, विनम्रता आदी विविध गुण दिसून येतात, याचे कौतुक मान्यवरांकडून करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे. गट क्र. 1 (पाचवी ते सातवी) ः प्रथम हर्षाली बाळकृष्ण ठाकुर (कडावल शाळा क्र. 1), द्वितीय गौरव धनाजी शिंदे (पांग्रड शाळा क्र. 1), तृतीय वृषाली लक्ष्मण मळगावकर (भडगाव हायस्कूल) व उत्तेजनार्थ अश्विनी आत्माराम फोंडेकर (भडगाव हायस्कूल), गट क्र. 2 (आठवी ते दहावी) ः प्रथम अमृता अनिरुद्ध करंदीकर (पांग्रड हायस्कूल), द्वितीय तनया शिवाजी वळंजू (भडगाव हायस्कूल), तृतीय साईनाथ संजय सातोसे (पांग्रड हायस्कूल) व उत्तेजनार्थ मैथिली रामकृष्ण नाईक (पांग्रड हायस्कूल).

कथा कशा असाव्यात, यासाठी बहिरम यांनी ‘सुंदर हात’, सौ. राणे यांनी ‘त्यागाची घंटा’, तर खराडे यांनी ‘जशास तसे’ या कथांचे सादरीकरण करून मुलांना मार्गदर्शन केले. वृषाली मळगावकर हिने वाचनालयावर कविता करून ती सादर केली. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले.

Related posts: