|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगाव, फातोर्डासाठी अत्याधुनिक 108 सेवेची रुग्णवाहिका

मडगाव, फातोर्डासाठी अत्याधुनिक 108 सेवेची रुग्णवाहिका 

प्रतिनिधी /मडगाव :

मडगाव व फातोर्डासाठीच्या अत्याधुनिक 108 सेवेच्या रुग्णवाहिकेचे नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. सदर रुग्णवाहिकेत ह्रदयविकारासंदर्भात तातडीने उपचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक महत्त्वाच्या सुविधा समाविष्ट आहेत.

यावेळी उपनगराध्यक्ष टिटो कार्दोज व गोवा फॉरवर्डशी संबंधित इतर नगरसेवक हजर होते. तसेच हॉस्पिसियो इस्पितळ देखरेख समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. व्यंकटेश हेगडे हेही उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी अपघातांच्या घटना नियंत्रणात यायला हव्यात आणि अपघातांमध्ये लोकांचे बळी जाता कामा नयेत, असे मत व्यक्त केले. उद्घाटन केलेल्या नव्या रुग्णवाहिकेत अत्याधुनिक सुविधा असून अशा घटनांच्या वेळी त्यांची भरपूर मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

…तर आणखी रुग्णवाहिका मागणार

या रुग्णवाहिकेचा चालक काणकोणचा असून त्याच्या जागी फातोर्डातील स्थानिक चालक नियुक्त व्हायला हवा, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले. कारण आणीबाणीच्या वेळी जिथे धाव घ्यावी लागेल त्या संपूर्ण स्थानिक परिसराचे चालकाला चांगले ज्ञान असायला हवे, असे ते म्हणाले. गरजा भागविण्याच्या दृष्टीने एक रुग्णवाहिका पुरेल का असे विचारले असता सरदेसाई म्हणाले की, आधी नव्या रुग्णवाहिकेकडून परिस्थिती कशी हाताळली जाते ते पाहिले जाईल आणि आवश्यकता भासल्यास आणखी रुग्णवाहिकेची मागणी केली जाईल.

Related posts: