|Wednesday, June 20, 2018
You are here: Home » विविधा » समाजात असांस्कृतिक कट्टय़ांना ऊत;डॉ. सदानंद मोरे यांचे परखड मत

समाजात असांस्कृतिक कट्टय़ांना ऊत;डॉ. सदानंद मोरे यांचे परखड मत 

 पुणे / प्रतिनिधी :

समाजातील सांस्कृतिक कट्टे हरपल्याने असांस्कृतिक कट्टय़ांना ऊत आला आहे. सोशल मीडियामुळे या कट्टय़ांना उत्तेजन मिळत असून, संस्कृती आणि भाषेचा ऱहास होत आहे, असे परखड मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘सांस्कृतिक कट्टय़ा’चे उद्घाटन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, समाजात असांस्कृतिकता वाढीस लागत आहे. सांस्कृतिक कट्टे विरूद्ध गावठी कट्टे अशी स्पर्धा निर्माण झाली असून, अशा कट्टय़ांनी सध्याचे वातावरण गजबजून गेले आहे. हे पाहता कलेत समतोल राखण्यासाठी सांस्कृतिक कट्टय़ांची गरज आहे. तर समाजातील वातावरण बदलण्याची जबाबदारी चौथ्या स्तंभाची असून, ते असांस्कृतिकता थांबविण्याचे काम चांगल्या तऱहेने पार पाडू शकतात.

जागतिकीकरणाच्या युगात भाषेसह संस्कृतीचाही ऱहास होत आहे. सगळ्या गोष्टी एका पठडीत बसविण्याचा प्रयत्न होत आहे. सांस्कृतिक वैविध्य नष्ट केले जात आहे. याचा गांभीर्याने विचार करून सांस्कृतिक वैविध्य टिकवण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल, हे पाहायला हवे. समाजातील लोकांची मते आणि विचार तयार करण्याची जबाबदारी वर्तमानपत्रांची असते. त्यामुळे वर्तमानपत्रांनी या आघाडीवर मोलाची भूमिका बजावली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रा. जोशी म्हणाले, कलावंताकडे कलावंत म्हणून पाहिले पाहिजे. साहित्यकृतीवर आणि कलेच्या आधारे त्यांचे मूल्यमापन करू नये. प्रतिभावंत कलावंत हे आयुष्य समृद्ध करतात. आज आपण भौतिकदृष्टय़ा संपन्न असलो, तरी सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न आहोत का, याचा विचार करावा. पत्रकारांनी अभिव्यक्त व्हावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष सुभाष खुटवड यांनी केले, तर चिटणीस सुकृत मोकाशी यांनी आभार मानले.

 

 

 

Related posts: