|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शह आणि काटशह

शह आणि काटशह 

अखेर रशिया, इराण आणि उत्तर कोरिया या देशांवर अमेरिकेने आर्थिक निर्बंध घातले. त्या दृष्टीने अमेरिकन प्रतिनिधीगृहाने आवश्यक तो ठराव संमत केला. आता सिनेटमध्ये विचार विनिमय पक्का झाला की हे निर्बंध जारी होतील. अमेरिकन जनतेच्या सुर†िक्षततेसाठी हे निर्बंध लादण्यात येत आहेत, असे प्रतिनिधी गृहाच्या सभापतींनी सांगितले. हे सांगताना अमेरिकेला अत्यंत धोकादायक ठरणाऱया शक्ती अशा आशयाच्या शब्दात त्यांनी संबंधित देशांचे वर्णन केले.

तीनही देशांवर निर्बंध लादण्याची कारणे वेगवेगळी आहेत. युक्रेन या शेजारी राष्ट्रावर आक्रमण करून त्याची कोंडी केल्याबद्दल रशियावर निर्बंध घालण्यात येत आहेत, तर एकापाठोपाठ एक अशा संहारक क्षेपणास्त्र चाचण्या केल्यामुळे उत्तर कोरियावर निर्बंध लादण्यात येत आहेत. दहशतवादाला पाठिंबा दिल्याबद्दल इराण आणि ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ यावर बंधने घालण्यात येत आहेत. वचक ठेवला नाही तर रशिया आपले आक्रमक धोरण चालूच ठेवील, अशी पुस्तीही अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापतींनी जोडली आहे.

हे निर्बंध लादून अमेरिका एका दगडात तीन पक्षी मारण्याच्या प्रयत्न करत आहे. रशियावरील निर्बंधांमुळे रशियाची आर्थिक उलाढाल कमी होईल. रशिया हा शस्त्रास्त्र निर्मिती आणि व्यापार यात महत्त्वाचा देश मानला जातो. परंतु अमेरिकेला वाटते त्याप्रमाणे रशिया काही केवळ त्याच देशावर अवलंबून नाही. रशिया पूर्वी भारताला शस्त्रास्त्र आणि युद्धसामुग्री पुरवीत असे आता तो भारताचा शत्रु पाकिस्तान याला ही या वस्तू पुरवतो. शिवाय तेलाचे उत्पादन आणि व्यापार यात रशिया पुढे आहे.

उत्तर कोरियावर निर्बंध लादण्यामागे चीनला शह देण्याचा अमेरिकेचा हेतू आहे. चीनने गुरगुरत आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. अशाप्रकारे एकतर्फी निर्बंध अमेरिका लादू शकत नाही, असे चीनने म्हटले आहे. त्यामुळे परस्परांमधील विश्वास आणि साहचर्याला तडा जातो असे चीनचे म्हणणे. उत्तर कोरियामध्ये चीनची प्रचंड गुंतवणूक आहे. त्या लहानशा देशावर निर्बंध लादले की त्याची आर्थिक कोंडी होउढन तेथील निर्वासितांचे लोंढे चीनमध्ये येतील ही बीजिंगची भीती आहे. परंतु, त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे उत्तर कोरियाच्या सततच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे उद्विग्न झालेले अमेरिकेने आपले मित्रराष्ट्र दक्षिण कोरियाबरोबर वाढत्या लष्करी कवायती करणे ही चीनला डाचणारी गोष्ट आहे.

अमेरिकेच्या दक्षिण कोरियासोबत असणाऱया लष्करी सहकार्यामुळे उत्तर चीन समुद्राकडे लष्करी लक्ष केंद्रीत करावे लागते. त्यात गुंतून पडण्याची चीनची इच्छा नाही. त्याला वन बेल्ट वन रोड (ओबोर) या योजनेवर जास्त भर द्यावयाचा आहे. त्यामुळे चिनी कारखान्यात तयार झालेला माल पश्चिमेत म्हणजे युरोपकडे पाठवणे जलदगतीने होईल. त्यामुळे निर्बंधाचा अंमल उत्तर कोरियावर असला तरी त्यांची जास्त झळ चीनला बसेल.

खरे म्हणजे अमेरिकेने अशा प्रकारचे एकतर्फी निर्बंध घातल्याने संबंधित देशांचे वाटते तेवढे नुकसान होणार नाही. इराणसारख्या देशाचा व्यापार आता फक्त समुद्रामार्गावर अवलंबून राहिला नाही. चाबहार बंदराच्या विकासाला मदत करून भारताने इराणशी सहयोग केला आहे. त्या बंदरापर्यंत जाणाऱया रस्त्यांच्या माध्यमातून चीनबरोबर व्यापारी उत्पादनांची देवघेव करणे इराणला शक्य आहे. थेट चीनमधून इराणपर्यंत जाणारी रेल्वे चीनने मागच्या वर्षीच सुरू केली. इराणबरोबर हळूहळू संबंध दृढ करून वायव्येकडील इस्लामी दहशतवादावर उपाययोजना करण्याची चीनची धडपड आहे. त्यामुळे अमेरिकेने इराणवर निर्बंध लावले तर चीन मदतीचा हात देईल. दुसरे असे की अशा प्रकारे इराणला मदत केली तर परस्पर इराण-भारत संबंधांवर तिचा परिणाम होईल, अशी चीनची अटकळ असू शकते.

अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत उत्तर कोरियाने मोठी दर्पोक्ती केली आहे. आपल्या राजवटीला धक्के देण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला तर अमेरिकेच्या छाताडावर प्रहार करणारा दणका आपण देउढ, असे उत्तर कोरियाकडून स्पष्ट करण्यात आले. असे करण्यासाठी अणूशक्तीचा प्रसंगी वापर करण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

अमेरिकन प्रतिनिधीगृहात वरील तीन राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध लादण्याच्या ठरावावर चर्चा होत असतानाच रशिया आणि चीन यांनी बाल्टिक समुद्रात नौदलाच्या संयुक्त कवायती केल्या. 1990 च्या राजकीय पडझडीनंतर बरीच वर्षे महासत्ता पदापासून दूर रा†िहलेल्या रशियाच्या वाढत्या लष्करी प्रकटीकरणामुळे युरोपातील देश अस्वस्थ होउढ लागले आहेत. बाल्टिक समुद्रातील रशिया-चीन संयुक्त कवायतींमुळे इस्टोनिया, लियुआनिया, लाटव्हिया आणि पोलंड अस्वस्थ झाले. यापैकी पहिले तीन देश 1990 पूर्वी रशियन प्रजासत्ताकाचेच भाग होते, तर पोलंडवर रशियाने अनेक वर्षे आपले वर्चस्व ठेवले
होते.

आपण आर्थिक निर्बंध लादत असताना रशिया चीनबरोबर हातमिळवणी करत आहे या वास्तवावर अमेरिका आणि भारत या दोघांनीही लक्ष ठेवले पाहिजे. चीन हा भारताशी उघडपणे फटकून वागत आहे. आणि एकेकाळी भारताचा मित्र असणारा रशिया आता चीन आणि पाकिस्तान यांच्याकडे ओढला जात आहे. आशियाई दक्षिण उपखंडात भारत यामुळे एकटा पडू शकतो.

साम्यवादाच्या प्रसाराच्या स्पर्धेत चीनला रोखणे ही 1990 पूर्वी रशियाची गरज होती. आता ती तशी उरली नाही. भारत अमेरिकेकडे जास्त झुकू लागल्यामूळे रशिया एकनिष्ठेने भारताला अनुकूल राहण्याचे कारण उरले नाही. आपण तीन पक्षी एकाच दगडात  मारू, असे अमेरिकेला वाटत असले तरी आशिया भोवतालच्या समुद्री प्रदेशात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन पुढे सरकत आहे. त्यासाठीच रशियाला ‘बाल्टिक’मध्ये सोबत घेतले आहे आणि भारत आणि अमेरिका यांना आपापल्या प्रदेशात एकटे पाडण्याचे हे प्रतिशह आहेत.

Related posts: