|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अदृष्य ‘हातां’मधला दोलायमान महाराष्ट्र!

अदृष्य ‘हातां’मधला दोलायमान महाराष्ट्र! 

बिहारमध्ये घडलेल्या राजकीय नाटय़ानंतर महाराष्ट्रातही त्याची पुनरावृत्ती होईल काय अशी चर्चा सुरू झाली आहे. काही ‘अदृष्य हात’ सरकार स्थिर करण्यास उपयोगी ठरतील असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे. पण, खरंच अशी परिस्थिती महाराष्ट्रात आली तर भाजपची युती कुणाबरोबर होईल? पर्याय तर दोनच आहेत आणि पहिला पर्याय सध्या भाजप सोबत आहे, शिवाय नाराज तर सगळीकडेच आहेत.

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांना सोडून नितीशकुमार यांनी भाजपबरोबर एका रात्रीत सरकार स्थापन केले. त्यातच शिवसेनेपेक्षा केंद्रात नितीशकुमार यांना जादा मंत्रीपदे मिळणार या चर्चेला महाराष्ट्रात उधाण आले. माध्यमांमध्येही एकच गलका सुरू झाला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी दरम्यान आघाडीतील फुटलेल्या मतांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकाकडे बोट दाखवले आहे. अत्यंत घाईगडबडीने राष्ट्रवादीने आपली मते स्थिर आहेत, रमेश कदम यांची आधीच हकालपट्टी केल्याने त्यांनी भाजपला मतदान केल्याच्या वाच्यतेला अर्थ नाही असेही सूचित केले. मात्र चर्चा थांबली नाही. दुसरीकडे काँग्रेसमध्ये राणे कुटुंबीय, समर्थकांची मतेही भाजपला मिळाली असतील असा संशय व्यक्त केला गेला. मुख्यमंत्र्यांनीही मग आमचे सरकार स्थिर असून शिवसेनाही सोबत आहे. काही गडबड झाली तरी अनेक अदृष्य हात सरकार वाचवायला पुढे येतील अशी टिप्पणी केली. अर्थात तात्काळ शिवसेनेकडूनही अदृष्य हात दोन्ही बाजूंनी मदतीला येऊ शकतात असे वक्तव्य आले.

अदृष्य हातावर चर्चा सुरू असली तरी खरोखर महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काय याचा विचार करावा लागेल. 5 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती निवडणुकीत काय होते त्याच्या निकालावरून पुढची वाटचाल ठरेल. 11 ऑगस्टपर्यंत सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात विविध राजकीय वळणे घेतली जातील असेही बोलले जाऊ लागले आहे. अर्थात या सर्वच जर-तरच्या बाता झाल्या. शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेणार तर कोणत्या मुद्यावर आणि भाजप शिवसेनेला सोडणार तर कोणत्या मुद्यावर हा पहिला प्रश्न असेल. खरंच जर महाराष्ट्रातील हे दोन पक्ष एकमेकापासून वेगळे होण्यास तयार झाले तर सत्ताधारी भाजपची युती कुणाबरोबर असेल? पर्याय राष्ट्रवादी हाच उरतो. त्यावर विचार होऊ शकतो. दुसरा पर्याय शिवसेना किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्हीमधल्या ‘अदृष्य हातांनी’ राजीनामा देऊन सभागृहात बहुमताचा आकडा घटवावा लागेल. अर्थातच चार महिन्यांमध्ये या पोटनिवडणुका घेणे सरकारला बंधनकारक असेल आणि त्यामध्ये हेच लोक निवडून येतील अशी शक्यता नसल्याने ‘अदृष्य हात’ राजीनामा देण्याचे धाडस करतील का हा प्रश्नच आहे. शिवाय भाजप हा खेळ कशासाठी खेळेल? आजच्या घडीला सेनेशी जुळवून घेत सरकार चाललेच आहे.

राष्ट्रवादीला कारवाईची भीती दाखवत आणि शिवसेनेला चुचकारत केंद्रात आणि राज्यातला गाडा चालवला जातो आहे. शिवाय आपली प्रतिमाही त्यामुळे बदलत नाही हे भाजपच्या एकूण विचारधारेसाठी सोयीचे असेच आहे. भाजपने लोकांना दिलेली आश्वासने अद्याप प्रत्यक्षात दिसायला काळ लागेल. त्यांनी मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचे दिलेले शब्द पिच्छा सोडायला तयार नाहीत. सरकार कोर्टाकडे, टाटा संस्थेकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहे. दोन्ही जातीतील काही नेत्यांना सुखावून, चांगली पदे देऊन, विविध शैक्षणिक सवलती जाहीर करून हा घटक सुखावेल कसा हे सरकारने पाहिले आहे. पण, त्याचे परिणाम अजून लोकांना बघायला मिळालेले नाहीत आणि फळ पदरात पडत नाही तोपर्यंत तरी भाजप गडबड करणार नाही.

तीच स्थिती शेती कर्जमाफीची. भारतातील सर्वात मोठी कर्जमाफी अशी जाहिरातबाजी सरकारने चालवली आहे. त्यासाठी इतर योजनांचा पैसाही वापरला आहे. पण, सरकार कर्जमाफीऐवजी कर्जवसुलीचे धोरण राबवत आहे अशी टीका करत शेतकरी सुकाणू समिती गावोगाव फिरते आहे. दुसरीकडे दोन्ही काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे आणि या दोन्ही घटकांकडे ग्रामीण भागात असलेला कार्यकर्त्यांचा आधार तुटलेला नसल्याने काँग्रेस, शेतकरी संघटना काय बोलते याकडे ग्रामीण महाराष्ट्राचे लक्ष आहे. शेतकरी समाज हा विविध जाती घटकांनी बनत असल्याने आजच्या घडीला 16 पानी फॉर्म भरून देण्यातील अडथळे आणि दहा हजारांचे न मिळालेले अग्रीम कर्ज हा सरकारच्या विरोधातला शेतकऱयांचा मुद्दा आहे. जोपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळून आपले कर्ज फिटले असे शेतकऱयाला दिसत नाही तोपर्यंत ते सरकारवर विश्वास ठेवणार नाहीत आणि योजनेविषयी शंका निर्माण करण्याचे काम शिवसेनेसह विरोधकही थांबवणार नाहीत. त्यामुळे सरकारला यासाठी काळ हवा आहे. शिवस्मारक, आंबेडकर स्मारक या भावनिक मुद्यांचाही बारकाईने विचार करणारे सरकारवरील त्रासदायक मुद्यांचा नक्कीच विचार करते आहे.

   भविष्यकालीन हुकूमशाहीची चुणूक

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षांतराबाबत आणलेल्या कायद्यावर विरोधकांनी सभागृहात मतदान घेतले. अर्थात त्यात सरकार जिंकले पण, सत्ताधाऱयांच्या मतातून काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्यांची मते वगळा हा अजितदादांचा चिमटा बरेच सांगून जातो. दोन्ही काँग्रेसच्या आमदारांना कोणीतरी शब्द देणारा हवा असतो. त्याच्या विश्वासावर ते त्या पक्षात सामील होतात. भाजपमध्ये आलेले हे आमदार शब्द पाळला नाही म्हणून चिंतेत आहेत शिवाय अमित शहा यांनी यापुढे आमदारांनी पक्षाकडे तक्रार करू नये, लोकांना नमस्कार करावा, गाडीतून फिरावे बाकीचे आमचे पक्षाचे पदाधिकारी बघतील. खांब जरी उभा केला तरी निवडून येईल असे संघटन आम्ही करू असे सांगून इथल्या भविष्यकालीन हुकूमशाहीची चुणूक दाखवलीच आहे. एकीकडे दोन्ही काँग्रेसचे भवितव्य आणि नेत्यांमधील भांडणाला वैतागलेले अदृष्य हात अस्वस्थ आहेत, दुसरीकडे शिवसेनेलाच अपमानित केले जात असल्याने आपल्याला काय मिळणार या चिंतेतले आमदार मुख्यमंत्र्यांशी जवळीक करताहेत, तिसरीकडे भाजपमध्ये स्पष्ट दिसू लागलेल्या हुकूमशाहीला कंटाळलेली मंडळीही आहेत. त्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याशी मतलब होता तो पूर्ण झालेला नाही. अशा आज कमजोर वाटणाऱया अनेक अदृष्य हातात एकेक खंजीर आहे तो कोणाच्या पाठीत खुपसला जाईल सांगणे मुश्किल पण, त्यामुळे महाराष्ट्र दोलायमान झाला आहे हे नक्की.

Related posts: