|Monday, January 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » व्यसनाधीनतेच्या विळख्यात

व्यसनाधीनतेच्या विळख्यात 

व्यसन हा शब्द डोळय़ासमोर आला की कोणती ना कोणती वाईट सवय नजरेसमोर येते. बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा, तपकीर, मिश्री, दारू, ताडी माडी, गांजा, चरस, अफू, भांग अशा कितीतरी गोष्टींची यादी या वाईट सवयीमध्ये मोडते. सामान्यत: लोकांच्या मनात व्यसन म्हणजे वाईट सवय असा अर्थ असतो. वरवर पाहता तो अर्थ बरोबर आहे. पण व्यसनाना त्यापेक्षा कितीतरी अधिक बाजू  आहेत. एखाद्या माणसाला स्वत:चे चित्त स्थिर ठेवण्यासाठी आणि शरीर चालू राहण्यासाठी जेव्हा एखाद्या सवयीला शरण जावे लागते तेव्हा त्या व्यक्तीला विशिष्ट अमली पदार्थाचे व्यसन लागते असे म्हटले जाते.

सर्वच प्रकारच्या व्यसनांना सुरुवातीच्या टप्प्यातच रोखणे महत्त्वाचे आहे. पण ‘मी  ड्रिंक्स घेतो मात्र मला त्याचे व्यसन नाही’ असाच बऱयाच जणांचा पवित्रा असतो. तुम्ही व्यसनांच्या आहारी चालला आहात हे ओळखण्यासाठी एक सोपा सल्ला… तुमच्या कुटुंबाला तुमचे पिणे किंवा जे काही व्यसन असेल ते आवडत नाही. तरीही तुम्ही ते सोडायला तयार नाही. त्यांनी विरोध केल्यावर तुम्ही चिडता तेव्हा समजा की तुम्ही धोक्याची रेषा ओलांडत आहात.

जेव्हा माणसाला व्यसन असते तेव्हा माणूस त्या अमली पदार्थाचा अक्षरश: गुलाम होतो. व्यसन या प्रश्नात अडकलेली सर्व कुटुंबे अक्षरश: भोवऱयात फिरत असतात. भावनिक कल्लोळात बुडालेली असतात आणि सामाजिक, आर्थिक परिस्थितीत भाजून निघत असतात. स्क्रिझोफेनियासारखा मानसिक आजार, नैराश्य, एच. आय. व्ही. एड्स असे काही आजारदेखील भोवऱयात अडवणारे प्रश्नच आहेत. या आजारावर उपचार असल्याचे अनेकांना ठाऊक नसते, परंतु त्यासंदर्भात जागृतीचे प्रयत्न चालू आहेत. पण व्यसनाधीनतेचे तसे नाही. हा प्रश्न कदाचित टक्केवारीच्या हिशेबाने एड्सपेक्षा मोठा आणि सारे कुटुंब उद्ध्वस्त करून टाकणारा, साऱया कुटुंबाला आर्थिक, सामाजिक आणि नैतिकदृष्टय़ा दिवाळखोर बनवणारा आहे. व्यसन एक माणूस करतो. पण त्यांचा परिणाम कमीत कमी वीस माणसांवर होतो.

योग्य उपचार हवेत

व्यसनाधीनता हा एक आजार असून योग्य उपचारांनी तो रोखता येतो. व्यसनाधीनतेवर मोफत औषधोपचार, समुपदेश, जिल्हा रुग्णालयात दिले जातात.  व्यसनाधीन व्यक्तीच्या वागण्याबद्दल टीका केली जाऊ लागते. ती व्यक्ती कुणाला जुमानत नाही. ती सबबी सांगू लागते आणि घरातल्या माणसांना त्या सबबी खऱया वाटू लागतात. पाटर्य़ा असल्यातरी त्याचे काहीतरी ताळतंत्र असतेच पण व्यसन लागलेला माणूस हळूहळू ते ताळतंत्र सोडतो. पाटर्य़ा वारंवार घडू लागतात. व्यसनी व्यक्ती हळूहळू नियमित नशा करू लागते. त्यातून घरातले वाद वाढतात आणि कुटुंबात आक्षेप निर्माण होतात. कुटुंबातल्या माणसांना समजत नाही कसे वागावे. त्याला झाकावे तर स्वतःला त्रास, त्याला झाकले नाही तर कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न. ‘तेंड दाबून बुक्क्मयाचा मार’ अशी अवस्था निर्माण होते. मग व्यसनाधीन व्यक्तीचे व्यसन नियंत्रणात आणायचे ही जबाबदारी आपलीच असे कुटुंबीयांना वाटू लागते. मग त्यावर ते उपाय करायला सुरुवात करतात. म्हणजे पैशावर नियंत्रण आणणे. त्या व्यक्तीला एकटय़ाला बाहेर जावू न देणे. त्याच्यावर पहारा ठेवणे असे प्रयत्न करून पाहिले जातात. त्यात त्यांची मोठी शक्ती खर्च होते. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. तरीही कुटुंबीय त्याला मदत करायला तयार असतात.

व्यसनासाठी तो कर्ज काढतो, उधारी करतो. ती कुटुंबीय फेडतात, व्यसनाधीन व्यक्तीला नोकरी नसेल तर नोकरी लावायचा प्रयत्न करतात. काहीजणांना वाटते त्या व्यक्तीचे लग्न लावून दिले की त्याचे व्यसन नियंत्रणात राहील. हे सगळे करत राहिल्यामुळे व्यसनी व्यक्तीचा असा समज होऊन बसतो की ‘मी काहीही केले तरी घरचे निस्तरतील’ या विचारांनी तो पिणे चालूच ठेवतो. कधी कधी कुटुंबीय मुख्यतः व्यसनाधीन व्यक्तीची पत्नी किंवा आई व्रतवैकल्ये करू लागतात. बाबा, बुवा, महाराज यांच्याकडे जातात परंतु या साऱयाचा क्वचित कोणा व्यक्तीच्या वर्तनात फरक पडू लागतो. थोडा वेळ दिलासा मिळतो. पण का कोण जाणे व्यसनी माणूस परत व्यसनाकडे वळतो मग कुटुंबीयांचा सहनशक्तीचा अंत होतो. या साऱया परिस्थितीत व्यसनी व्यक्तीची आई किंवा पत्नी जास्त भरडली जाते. कुटुंब विस्कटून जाते. मग कुणाची पत्नी माहेरी निघून जाते. तर कधी आई-वडील मुलाला घराबाहेर काढतात. व्यसनी माणूस रस्त्यावर येतो आणि मग कुटुंबीयांना प्रश्न पडतो. आमचे काय चुकले? का भोगावे आम्ही असे जीवन? यातून संताप, भीती, नैराश्य, चिंता अशा भावना जन्माला येतात. पण हे सगळे नियंत्रणात ठेवता येणे शक्मय आहे. निराश होण्याचे कारण नाही. कारण गेल्या कित्येक वर्षात भारतात व्यसनी व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने अनेक आशादायक गोष्टी घडून येत आहेत.

व्यसनाधीनतेसाठी उपचार

व्यसनापासून मुक्त व्हायचे असेल तर सर्वात प्रथम व्यसनापासून लांब राहण्याचा निर्धार करणे आवश्यक असते. जसे योग्य उपचारांनी इतर शारीरिक व मानसिक आजार नियंत्रणात आणता येतात किंवा बरे करता येतात. तसेच योग्य उपचाराने दारूच्या व्यसनाला नियंत्रणात आणता येते. किंवा पूर्ण बरे करता येते. जर आपल्या कुटुंबातील व्यक्तीस दारूच्या व्यसनापासून परावृत करावयाचे असल्यास जिल्हा रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभाग तसेच मानसोपचार तज्ञांची मदत घेऊ शकता. तसेच मानसिक आरोग्य विभागातील मंडळी आपल्या आवडत्या पण व्यसनाधीन व्यक्तीस दारूच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. या उपचारात मनोविकास तज्ञांमार्फत तपासणी, शारिरीक तपासणी, मानसोपचार, समुपदेशन, औषधोपचार यांचा समावेश असेल आणि सर्व सुविधा मोफत दिल्या जातात.

व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबासाठी

कुटुंबीयांना या त्रासातून वाचायचे असेल तर त्यांनी काही ठोस पावले उचलायला हवीत. सर्वात प्रथम व्यसनांविषयी आवश्यक ती माहिती मिळवायला हवी. व्यसनांविषयी माहिती घेतल्यानंतर व्यसन या आजाराविषयी माहिती घेणे जरुरीचे आहे. आजाराचे वेगवेगळे टप्पे, त्या टप्प्यांवर होत जाणारे शारीरिक, मानसिक बदल यांची माहिती घेणे आवश्यक आहे. हा आजार कोणत्या स्थितीत आहे, हे जाणून घेऊन त्यावर कोणते उपचार घेणे आवश्यक आहे, ते समजून घेता येऊ शकते. त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे हा आजार आहे आणि तो माझ्या कुटुंबातील व्यक्तीला झाला आहे या कटु सत्याचा मनोमनी नव्हे काया वाचा मनाने स्वीकार करणे. व्यसनमुक्तीच्या प्रवासातला हा सर्वाधिक अवघड टप्पा आहे. हा टप्पा ओलांडला तर पुढची वाट सुकर असते.

रेश्मा भाईप

 चिकित्सालयीन मानस शास्त्रज्ञ

Related posts: