|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोहीनूर हॉटेलमधून 24 लाखांची रोकड लंपास

कोहीनूर हॉटेलमधून 24 लाखांची रोकड लंपास 

इलेक्ट्रॉनिक तिजोरी फोडून केली चोरी

हॉटेल व कॉलेजच्या व्यवहारांमधून आलेल्या रोख रकमेची चोरी

प्रतिनिधी /रत्नागिरी

येथील कोहीनूर हॉटेलमधून 24 लाख रूपये किमतीची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना पुढे आली आहे. शुक्रवारी सकाळी चोरी झाल्याचे उघड होताच खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळी ऊशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोहीनूर हॉटेल व कॉलेजचे व्यवस्थापक रमणिकसिंग सिंधू यांनी याविषयीची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोदवली आहे. यानुसार, 27 जुलै सायंकाळी 6 ते 28 जुलै सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. कोहीनूरच्या ऑफिसमधून ही चोरी झाली आहे.

संदीप घाणेकर कोहिनूरमध्ये अकाऊंटंट म्हणून कामाला आहेत. 27 जुलै रोजी सायंकाळी संदीप आपले काम आटपून घरी गेले. दुसऱया दिवशी सकाळी 8.45 च्या सुमारास ते हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी पँट्री कर्मचारी भाऊ सागवेकर त्यांना भेटले. सागवेकर यांनी संदीप घाणेकर यांना चोरीविषयी सांगितले. आपण दूध आणण्यासाठी गेलो असताना कुलूप लावण्याची कडी हातात आल्याचे व कुलूप तिथे नसल्याचे सांगितले.

भाऊ सागवेकर यांना संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहणी केली. तेव्हा तिजोरी फोडून आतील रोख रक्कम चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेविषयी व्यवस्थापक रमणिकसिंधू यांना सांगण्यात आले. त्यांनी पाहणी केली असता 23 लाख 90 हजार रूपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याविषयी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळी ऊशिरापर्यंत सुरू होती. कोहीनूर हॉटेललाच चोरटय़ांनी लक्ष करून तब्बल 23 लाखा 90 हजार रूपये इतकी रोख रक्कम लांबवल्याने शहरात दिवसभर याविषयी चर्चा करण्यात येत होती.

चोरटा शोधण्याचे आव्हान

शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आह. या पार्श्वभूमीवर थेट इलेक्ट्रॉनक तिजोरीतील ऐवज लंपास करण्यात आल्याने ते शोधण्याचे पोलीसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू केला आहे.

इलेक्ट्रॉनिक तिजोरी फोडून ऐवज लंपास

कोहिनूरच्या ऑफिसमध्ये लोखंडी कपाट आहे. यात इलेक्ट्रॉनिक तिजोरीची व्यवस्था करण्यात आली होती. यात हे पैसे ठेवण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे. या तिजोरीतील ही रक्कम लंपास झाल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हॉटेलमधील व कॉलेजशी संबंधित होती रोख रक्कम

चोरीस गेलेली 23 लाख 90 हजार रूपये इतकी रोख रक्कम हॉटेलमधील व कॉलेजशी संबंधित व्यवहारातून आलेली होती, असे सांगण्यात येत आहे. ही रक्क्म या तिजोरीत ठेवण्यात येत असे.

Related posts: