|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » निवळी परिसरात जाकडीबुवाचा खून?

निवळी परिसरात जाकडीबुवाचा खून? 

खून की आत्महत्त्या याबाबत संभ्रम

महामार्गालगत झुडपात सापडला मृतदेह

कापडगावमधील वसंत पेजे यांचा मृत्यू

सुप्रसिध्द जाकडीबुवा म्हणून होते परिचित

प्रतिनिधी /रत्नागिरी

मुंबईला जातो सांगून घरातून बाहेर पडलेल्या कापडगाव येथील वसंत पेजे (47) यांचा मृतदेह निवळी येथे महामार्गापासून काही अंतरावर झुडपात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पेजे हे जाकडीबुवा म्हणून प्रसिद्ध होते. दोन दिवसांपासून उभ्या असलेल्या दुचाकीमुळे ग्रामस्थांनी आजूबाजूनच्या परिसरात पाहणी केली असता मृतदेह दृष्टीस पडला. दोन दिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असून हा नेमका खून की आत्महत्या याबाबत संभ्रम आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत गोपाळ पेजे हे कापडगाव फणसवाडी येथील रहिवाशी आहेत. पेजे हे सब ठेकेदार म्हणून काम करत होते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्यांचा राबता होता. त्याचबरोबर ते फणसवाडीत सुप्रसिध्द जाकडी बुवा म्हणूनही ते परिचित होते.

वसंत पेजे दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडले. मुंबईला कामासाठी जात असल्याचे सांगून ते निघाले. कुटुंबियांनाही ते कामासाठी मुंबईला गेले असावेत असे वाटले. मात्र, अचानकपणे निवळी परिसरात त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडली आहे. मुंबईतुन घरी परतण्याची वाट पाहणाऱया पेजे कुटुंबियांवर या घटनेने मोठे संकट कोसळले आहे.

शुक्रवारी सायंकाळी निवळी परिसरातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात अज्ञाताचा मृतदेह स्थानिकांना दिसून आला. त्यामुळे ग्रामस्थही अवाप् झाले. मृतदेहाची खातरजमा होत नसल्याने त्याविषयीची खबर ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. या घटनेची खबर मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मृतदेहाविषयी ग्रामस्थांच्या मदतीने खातरजमा करण्यासाठी चौकशी सुरू केली. त्यावेळी वसंत पेजे यांचा मृतदेह असल्याची चर्चा सुरू झाली.

पेजे यांच्या परिचितांमधुन याबाबतची खातरजमा झाल्यानंतर याची खबर पेजे यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. ज्याठिकाणी वसंत पेजे यांचा मृतदेह मिळून आला त्याठिकाणच्या रस्त्यावर दुचाकी दोन दिवस उभी होती. त्यामुळे या दुचाकीबाबतही ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरलेले होते. या दुचाकीवरून त्या परिसरात ग्रामस्थांनी चाचपणी केली असता पेजे यांचा मृतदेह मिळून आला.

पोलिसांनी केलेल्या पाहणीत मृतदेहाच्या गळाभोवती खुणा आढळून आल्या आहेत. अन्यत्र कुठेही मारहाणीच्या खुणा आढळून आल्या नसल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे हा खून की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेचे गुढ उकलण्यासाठी ग्रामीण पोलीस यंत्रणेने चौफेर तपाससूत्रे फिरवली असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

Related posts: