|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » चार भारतीय बॅडमिंटनपटू टॉप-20 मध्ये

चार भारतीय बॅडमिंटनपटू टॉप-20 मध्ये 

 सर्वोत्तम 50 खेळाडूंच्या यादीत भारताचे 7 खेळाडू, अमेरिकन ओपनजेत्या प्रणयची 17 व्या स्थानी झेप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शुक्रवारी जागतिक बॅडमिंटन महासंघाने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताच्या चार स्टार बॅडमिंटनपटूंनी टॉप-20 मध्ये झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, भारतीय खेळाडूंनी चिनी खेळाडूंना मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. पहिल्या 50 खेळाडूंच्या यादीत 7 भारतीयांचा समावेश आहे. चीनचे सहा खेळाडू टॉप 50 खेळाडूंच्या यादीत आहेत.

आतापर्यंत बॅडमिंटनमध्ये चीन, डेन्मार्क, चिनी तैपेई, मलेशिया, हाँगकाँगच्या खेळाडूंचे वर्चस्व होते. मात्र या सर्व देशांना कडवी टक्कर देत भारताच्या सात खेळाडूंनी टॉप-50 मध्ये स्थान मिळवले आहे. गत आठवडय़ात पार पडलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावत प्रणॉयने या वर्षातील पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली होती. तब्बल 21 महिन्यानंतर जेतेपद पटकावणाऱया प्रणॉयने सहा स्थानांनी प्रगती करताना 17 वे स्थान मिळवले आहे. दुखापतीतून सावरत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱया पारुपल्ली कश्यपलाही 12 स्थानाचा फायदा झाला आहे. ताज्या क्रमवारीत तो 47 व्या स्थानी विराजमान आहे.  के.श्रीकांतने आपले आठवे स्थान कायम राखले आहे. अजय जयराम 16 व्या तर बी.साई.प्रणिथ 19 व्या स्थानी कायम आहे. युवा खेळाडू समीर वर्मानेही चार स्थानांनी उडी घेत 28 व्या स्थानी झेप घेतली आहे.

महिलांत भारतीची ऑलिम्पिक रौप्यजेती पीव्ही सिंधू पाचव्या स्थानी कायम आहे. फुलराणी सायना पुन्हा टॉप-10 मधून बाहेर पडली आहे. ताज्या क्रमवारीत सायना 16 व्या स्थानी आहे. सायना व सिंधू वगळता एकही भारतीय खेळाडू टॉप-20 मध्ये नाही.

जागतिक क्रमवारीत सुन वान हो, तेई तेजु यिंग अग्रस्थानी

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या ताज्या पुरुष्घ् क्रमवारीत दक्षिण कोरियाचा सुन वान हो अग्रस्थानी आहे. मलेशियाचा ली चोंग वेई दुसऱया तर डेन्मार्कचा व्हिक्टर ऍक्सलेसन तिसऱया स्थानी आहे. महिलांत चिनी तैपेईची तेई तेर्जु यिंगने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. जपानची अकाने यामागुची दुसऱया तर दक्षिण कोरियाच्या सुंग जी हय़ुन तिसऱया स्थानी आहे.