|Friday, April 19, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताची कसोटीवर मजबूत पकड

भारताची कसोटीवर मजबूत पकड 

पहिली कसोटी : मुकुंद-कोहलीची अर्धशतके, भारत 498 धावांनी पुढे, दिलरुवान-मॅथ्यूजची अर्धशतके, जडेजाचे 3 बळी

वृत्तसंस्था / गॅले

भारताने पहिल्या कसोटीच्या तिसऱया दिवशीअखेर यजमान लंकेवर एकूण 498 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. लंकेचा पहिला डाव 291 धावांत आटोपल्यानंतर भारताने दुसऱया डावात दिवसअखेर 3 बाद 189 धावा जमविल्या. अभिनव मुकुंदने 81 धावा काढल्या तर कर्णधार कोहली 76 धावांवर खेळत होता. लंकेच्या डावात दिलरुवान परेरा 92 धावांवर नाबाद राहिल्याने त्याचे शतक हुकले. भारतातर्फे जडेजाने 3 बळी टिपले.

भारताने लंकेचा डाव 291 धावांत संपवून 309 धावांची आघाडी घेतली होती. पण फॉलोऑन न देताना दुसरा डाव खेळण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावातील शतकवीर शिखर धवन (14) व चेतेश्वर पुजारा (15) लवकर बाद झाल्यानंतर मुकुंद व कोहली यांनी शानदार अर्धशतके झळकावत भारताला जवळपास पाचशेची आघाडी मिळवून दिली आहे. लंकेचा असेला गुणरत्ने हाताच्या अंगठय़ाला दुखापत झाल्याने फलंदाजीस येऊ शकला नाही. नियमित कर्णधार दिनेश चंडिमल तंदुरुस्त नसल्याने  रंगना हेराथकडे या सामन्याचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. मात्र हाताला दुखापत झाल्याने तोही मैदानाबाहेर गेल्याने लंकेच्या अडचणीत आणखी भर पडली. 2 बाद 56 अशा स्थितीनंतर दिवअखेर कोहली (114 चेंडूत 5 चौकारांसह 76) खेळत असून मुकुंदसमवेत त्याने तिसऱया गडय़ासाठी 133 धावांची भागीदारी केली. मुकुंद 116 चेंडूत 8 चौकारांसह 81 धावांवर पायचीत झाल्यावर दिवसाचा खेळ थांबविण्यात आला. मुकुंदने त्याआधी पुजारासमवेत दुसऱया गडय़ासाठी 37 धावा जोडल्या होत्या.

मॅथ्यूज-परेराची शतकी भागीदारी

लंकेने 5 बाद 154 धावसंख्येवरून तिसऱया दिवसाच्या खेळास प्रारंभ केला. अँजेलो मॅथ्यूज व दिलरुवान परेरा यांनी भारतीय माऱयाचा समर्थपणे मुकाबला करीत सहाव्या गडय़ासाठी 62 धावांची भर घातली. जडेजाने ही जोडा फोडताना मॅथ्यूजला 83 धावांवर बाद केले. फ्लाईट दिलेल्या चेंडूला मागे सरकून मॅथ्यूजने कव्हर्सच्या दिशेने जोरदार फटका मारला. पण तो थेट कोहलीच्या हातात गेला. मॅथ्यूजने 130 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार, एक षटकार मारला. परेराने जिगरबाज प्रदर्शन पुढे चालू ठेवत नव्वदीत मजल मारली होती. पण जडेजाने नंतर हेराथ व लाहिरु कुमाराला त्रिफळाचीत करून लंकेचा डाव 291 धावांत संपुष्टात आणला तेव्हा परेरा 92 धावांवर नाबाद राहिला. गुणरत्ने जखमी असल्याने फलंदाजीस येऊ शकला नाही. भारतातर्फे जडेजाने 67 धावांत 3 बळी मिळविले तर शमीने 2, उमेश यादव, हादिंक पंडय़ा, अश्विन यांनी एकेक बळी मिळविला. परेराने 132 चेंडूंच्या नाबाद खेळीत 10 चौकार व 4 षटकार मारले. परेराविरुद्ध झेलचे अपील पंचांनी फेटाळून लावल्यानंतर जडेजाने त्याला पायचीत केले होते. पण रिव्हय़ूमध्ये तो नाबाद ठरल्याने हा निर्णयही बदलावा लागला. अश्विनला षटकार मारल्यानंतर एक धाव घेत कसोटी क्रिकेटमधील पाचवे अर्धशतक परेराने 94 चेंडूत पूर्ण केले. त्याने हेराथसमवेत सातव्या गडय़ासाठी 36 तर प्रदीपसमवेत आठव्या गडय़ासाठी 39 धावांची भर घातली होती. हार्दिकने पहिला कसोटी बळी मिळविताना नुवान प्रदीपला त्रिफळाचीत केले. लंकेने 57 क्या षटकात 200 तर 70 व्या षटकात 250 धावांचा टप्पा गाठला

भारताने दुसरा डाव सुरू केल्यावर परेराने शिखर धवनला 14 धावांवर बाद केले तर लाहिरु कुमाराने पुजाराला 15 धावांवर तंबूत धाडले. चहापानाच्या 40 मिनिटे आधी वादळी पावसास सुरुवात झाली होती. पण कुमाराकडे एक चेंडू टाकण्याइतका वेळ होता. त्यावर त्याने पुजाराला लेगगलीमध्ये झेल देण्यास भाग पाडले. तो बाद झाल्यानंतर चहापान लवकर उरकण्याचा निर्णय घेतला.

धावफलक

भारत प.डाव 600, लंका प.डाव (5 बाद 154 वरून पुढे)-दिमुथ करुणारत्ने पायचीत गो. उमेश यादव 2, उपुल थरंगा धावचीत 64 (93 चेंडूत 10 चौकार), दनुष्का गुणथिलका झे. धवन गो. शमी 16 (37 चेंडूत 2 चौकार), कुसल मेंडिस झे. धवन गो. मेंडिस 0, मॅथ्यूज झे. कोहली गो. जडेजा 83 (130 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), दिलरुवान परेरा नाबाद 92 (132 चेंडूत 10 चौकार, 4 षटकार), हेराथ झे. रहाणे गो. जडेजा 9 (13 चेंडूत 1 चौकार), नुवान प्रदीप त्रि. गो. हार्दिक पंडय़ा 10 (26 चेंडूत 1 चौकार), लाहिरु कुमारा त्रि. गो. जडेजा 2, गुणरत्ने दुखापतीने खेळला नाही, अवांतर 5, एकूण 78.3 षटकांत 9 बाद 291.

गडी बाद होण्याचा क्रम -1-7, 2-68, 3-68, 4-125, 5-143, 6-205, 7-241, 8-280, 9-291.

गोलंदाजी : शमी 12-2-45-2, उमेश यादव 14-1-78-1, आर.अश्विन 27-5-84-1, रवींद्र जडेजा 22.3-3-67-3, हार्दिक पंडय़ा 3-0-13-1.

भारत दु.डाव -धवन झे. बदली डी सिल्वा गो. परेरा 14 (14 चेंडूत 3 चौकार), अभिनव मुकुंद पायचीत गो. गुणथिलका 81 (116 चेंडूत 8 चौकार), पुजारा झे. मेंडिस गो. कुमारा 15 (35 चेंडूत 2 चौकार), कोहली खेळत आहे 76 (114 चेंडूत 5 चौकार), अवांतर 3, एकूण 46.3 षटकांत 3 बाद 189.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-19, 2-56, 3-189.

गोलंदाजी : प्रदीप 10-2-44-0, डी. परेरा 12-0-42-1, कुमारा 11-1-53-1, हेराथ 9-0-34-0, गुणथिलका 4.3-0-15-1.

Related posts: