|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहरात घरफोडय़ा करणारी टोळी जेरबंद

शहरात घरफोडय़ा करणारी टोळी जेरबंद 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील व शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार घरफोडय़ा करणारी टोळीच सातारा शहर पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच टोळीतील चोरटय़ांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याचे कबुल केले असून घरफोडीतील 4 लाख 63 हजार 730 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. पाच चोरटय़ांपैकी तीन चोरटे हे कोल्हापूरातील आहेत. घरफोडीतील चोरीचा माल या चोरटय़ांनी कोल्हापूर येथे विकल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे यांनी दिली.

सातारा शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. त्यावेळी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण सारंगकर, डिटेक्शन ब्रॅन्चचे प्रभारी अधिकारी समाधान चवरे उपस्थित होते. डॉ. धरणे म्हणाले, सातारा शहर पोलीस ठाणे आणि शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री व दिवसा घरफोडय़ांचे प्रमाण वाढले होते. त्याच अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगाराची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सारंगकर यांनी तसे आदेश डिटेक्शन ब्रॅन्चला दिले गेले.

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील काही गुन्हेगार हे रात्री व दिवसा घरफोडी करत असल्याची माहिती पोलीस जवान प्रवीण फडतरे यांना खास खबऱयामार्फत मिळाली होती. त्यानुसार लगेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी रेकॉर्डवरील संकेत दिनेश राजे (रा.भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, सातारा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तब्बल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात घरफोडय़ा केल्याची कबुली दिली. त्याला या घरफोडय़ामध्ये सहकार्य करणारे संजय एकनाथ माने (रा. भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, सातारा), संतोष नारायण मंझाले (रा. जोशीनगर, कोल्हापूर), महेश मारुतराव झोपडेकर (रा. महादेवगल्ली कोल्हापूर), राजुगोंडा बाबूराव पाटील (रा. कळंबा, कोल्हापूर) यांना अटक केली आहे. त्यांनी घरफोडीत चोरी केलेला ऐवज कोल्हापूरात विकल्याचे सांगितले.

चोरीतील 4 लाख 63 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यामध्ये 135 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक सोन्याची साखळी, एक मंगळसुत्र, दोन पाटल्या, सहा बांगडय़ा अणि एक सोन्याची लड असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या मोहिमेत आमचे सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सारंगकर, डीबीचे समाधान चवरे, सहाय्यक फौजदार एल. बी. शेख, पोलीस नाईक प्रवीण फडतरे, संतोष महामुनी, पोलीस शिपाई सोमनाथ शिंदे, प्रदीप मोहिते, अविनाश चव्हाण, पकंज ढाणे, शिवाजी भिसे, महिला पोलीस शिपाई सुवर्णा बोराटे यांनी चांगली कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षकांकडून कौतुक

सातारा शहरच्या डीबीने घरफोडय़ाची टोळी पडकल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Related posts: