|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गणेश विसर्जनासाठी मोती तळेच

गणेश विसर्जनासाठी मोती तळेच 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहराला बाप्पांच्या आगमनाची आतुरता लागली आहे. असे असताना शहरवासियांना लक्ष लागून राहिले ते पालिका विसर्जन तळे कोठे करते त्याची. मात्र, सातारा पालिकेत पदाधिकाऱयांच्या गोपनिय बैठका झाल्या असून त्यांनी मोती तळय़ातच यावर्षीचा गणेश विसर्जन सोहळा करण्याववर शिक्कामोर्तब झाले आहे. दुसरे कुठलेही कृत्रिम तळे करुन पालिकेचा पैसा वाया घालवायचा नाही, असेही ठरले आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक शनिवारी सकाळी 11 वाजता  होणार असल्याचे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सांगितले.

सातारा शहरात ऐतिहासिक तळी आहेत. त्यामध्ये मोती तळे, मंगळवार तळे, फुटका तलाव आणि गोडोलीतील तळे. असे असताना दोन वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्त्यानी प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होते याकारणास्तव उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ऐतिहासिक तळय़ांचे संवर्धन करा, असे आदेश पालिकेला दिले. पालिकेने मग जिल्हा परिषदेच्या जागेत कृत्रिम तळे काढण्यासाठी तब्बल 40 लाख रुपयांचा निधी खर्च होत होता. तात्कालिन नगराध्यक्ष सचिन सारस आणि विजय बडेकर यांनी तळे खोदलेही आणि पुन्हा बुजवलेही. आता यावर्षी पुन्हा गणेश विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेश विसर्जनासाठी पालिका पदाधिकाऱयांनी तळय़ातील पाहणी केली. परंतु त्यांनाही कोडे सुटले नाही. त्यामुळे याच विषयाच्या अनुषंगाने पालिकेत नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबीनमध्ये गोपनिय बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये काय झाले काय नाही हे मात्र समजले नाही. परंतु या बैठकामध्ये गणेश विसर्जनासाठी मोती तळे पक्के करण्यात आले असून मोठय़ा गणेशमुर्ती बसविणाऱया गणेशोत्सव मंडळाना मोती तळय़ामध्येच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे मिळते. त्यामुळे मोती तळयावरच पालिकेची शिक्कामोर्तब झाली असून तसेच घरगुती गणेशमुर्ती विसर्जनासाठी छोटी तलाव करण्यात येणार आहेत.

आज गणेशोत्सव मंडळांची बैठक

शहरातील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पालिकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले आहे.