|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अळंबी तोडा..पण जपून !

अळंबी तोडा..पण जपून ! 

जगन्नाथ मुळवी/ मडकई

रूचकर लागणारी ‘अळंबी’ ही फक्त जंगलातच मिळत नाहीत तर अगदी घराच्या बाजुलाही उगवतात. हंगामात उगवणाऱया या अळंब्याकडे बरेचजण व्यवसाय म्हणून पाहतात. मात्र काहीजण हीच अळंबी मित्र परिवार व शेजाऱयांना फुकट वाटून स्नेह जपत असतात.

 श्रावण महिन्यात गोव्यातील बाजारपेठेत व रस्त्याच्या बाजूला विक्रीसाठी ठेवलेल्या अळंब्याच्या पुढय़ा सर्रासपणे दिसतात. बरेच लोक या काळात शाकाहार पाळत असल्याने त्यांच्या जेवणीची चव या अळंब्यामुळे जपली जाते. खवय्यांकडून वाढती मागणी लक्षात घेऊन अळंबी विकणारे लोकही अव्वाच्या सव्वा दरात ती विकतात.   अळंब्यांना बाजारात मिळणारे दर पाहून ती खुडून आणण्यासाठीही घाई केली जाते. त्यामुळे नुकतेच उगवलेले अळंब्याचे कळे तोडून ते विक्रीसाठी आणतात. त्यामुळे त्यांची खरी चव आजच्या खवय्यांना चाखता येत नाही.

 आपण पाहून ठेवलेली अळंबी दुसऱयाने खुडू नये यासाठी त्यावर पाला झाकणे,   मध्यरात्री रानात जाऊन विजेरीच्या साहाय्याने ती अर्धवट खुडून आणणे असे  विविध प्रकार घडत असतात. या अधाशी वृत्तीमुळे अळंब्याच्या उत्पादनावर परिणाम होत असतो. बऱयाचवेळी एखाद्या वारुवर येणारी अळंबी पुढच्यावर्षी घटतात किंवा येणेच बंद होतात. वास्तविक अळंबी तोडताना काही कळे पुढच्या वर्षी येण्यासाठी ‘बी’ म्हणून तसेच ठेवावे लागतात. मात्र त्याचा विचार कुणीच करीत नाहीत. एकदाच मुळासकट अळंबी खोदून त्यावर पैसे कमावण्याऱया लोकांमुळे या निसर्गक्रमात बाधा येते.

 अळंब्यासाठी कुणीही मशागत करत नाही

खुल्या निसर्गात उगवणाऱया या अळंब्यांचा व्यवसाय करणारे काही लोक अजिबात विचार करत नाहीत. त्यांना पूर्णपणे उगविण्यासाठी वेळ न देताच ती अनेकदा जास्त दर मिळत असल्याने काढली जातात. ती पेरण्यासाठी, त्याचे पीक घेण्यासाठी कुणीही परिश्रम घेत नसतो. ती निसर्गाने दिलेली देणगी आहे. तरीही काही लोक पन्नास ते शंभर अळंब्यांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत दर आकारतात.

 बरेच लोक आपल्या घराशेजारी अळंबी उगवलेली आढळून आल्यास ती परिपक्व झाल्याशिवाय काढत नाहीत. अशा लोकांनाच त्यांची खऱयाअर्थाने चव चाखायला मिळते. पूर्ण वाढलेले अळंब्याच्या कळय़ांचे पदार्थही खाण्यात एक वेगळाच आनंद असतो. ही पूर्ण वाढ झालेली अळंबी मानवतेच्या धर्मातून मित्रांना दिलेली असतात. तिची चव खरोखरच चांगली असते. अळंबीच्या दानातून संबंध जोडले जातात व स्नेहही टिकून राहतो.

Related posts: