|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » …अखेर फरार राजू घस्तेला अटक

…अखेर फरार राजू घस्तेला अटक 

प्रतिनिधी/ निपाणी

हेस्कॉममध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने युवकाकडून साडेसात लाख रुपये उकळल्याप्रकरणी फरार असलेला दुसरा संशयित आरोपी राजू बसवंत घस्ते (वय 24, रा. मूळगाव पट्टणकुडी, सध्या रा. हुडको कॉलनी निपाणी) याला शुक्रवारी शहर पोलिसांनी अटक केली. येथील अकोळ रोडनजीक दुपारी 3.30 च्या सुमारास राजूला ताब्यात घेण्यात आले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी राजू घस्ते व सुंदर कांबळे यांनी संदीप सदाशिव पाचिंगे (रा. रोहिणीनगर निपाणी) याला हेस्कॉममध्ये नोकरीला लावतो असे सांगून त्याच्याकडून साडेसात लाख रुपये घेतले होते. मात्र वर्ष झाले तरी नोकरी न मिळाल्याने संदीपने पैसे परत देण्यासाठी राजूकडे तगादा लावला. मात्र या दोघांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने संदीपने 21 रोजी येथील शहर पोलिसात राजू व सुंदर यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी 21 रोजी तात्काळ सुंदरला अटक केली. मात्र दुसरा संशयित राजू हा फरारच होता.

दरम्यान, सुंदरला अटक केल्याची बातमी वृत्तपत्रामधून प्रसिद्ध होताच अनेकांनी पोलिसात धाव घेऊन सुंदर तसेच राजूने आपल्याकडूनही पैसे घेतल्याचे सांगितले. मात्र अधिकृत फिर्याद कोणीही दिली नाही. एका व्यावसायिकाकडून राजू व सुंदर यांनी तब्बल 29 लाख रुपये घेतले होते. मात्र चौकशीचा फेरा व अब्रूच्या भीतीपोटी त्याने तसेच अनेकांनी फिर्याद दिली नाही. यामुळे फसवणुकीचा आकडा कोटींच्या घरात असला तरी नेमका आकडा किती हे पोलिसांनाही समजणे अवघड बनले होते.

सुंदरला अटक केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ राजूचा शोध सुरू ठेवला होता. मात्र राजूचा मोबाईल बंद असल्याने त्याला शोधण्यात अडचणी येत होत्या. अखेर शुक्रवारी दुपारी येथील अकोळ रोडनजीक सापळा रचून पोलिसांनी राजूला ताब्यात घेतले व त्याच्यावर आयपीसी 170, 171, 420, 469, 406 आरडब्ल्यू 34 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री राजूला येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

हेस्कॉममध्ये अभियंता असल्याचे नाटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण हेस्कॉममध्ये अभियंता असल्याचे तसेच वरिष्ठ अधिकारी आपल्या ओळखीचे आहेत असे सांगून कर्नाटक विद्युत बोर्ड (केईबी) मध्ये नोकरीला लावतो असे सांगून राजूने अनेकांकडून पैसे घेतले होते. एवढेच नव्हे तर अभियंता असल्याचे सांगून निपाणीतील युवतीशी प्रेमविवाह केला होता. राजू व सुंदरच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी लाखो रुपये दिले होते. त्याबदल्यात राजू व सुंदरने हेस्कॉम-केईबीचे बनावट शिक्के, बनावट नियुक्तीपत्रे सदर युवकांना दिली होती.

चैनीसाठी खर्च केले पैसे

संदीप पाचिंगे याने दिलेल्या फिर्यादीनंतर सदर प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत हे दिसून आले. राजूने वर्षभरापूर्वीच येथील हुडको कॉलनीत 11 लाख रुपयांना बंगला घेतला आहे. हा बंगला फसवणुकीच्या पैशातूनच घेतल्याचे स्पष्ट झाले. मुख्य म्हणजे राजूने सर्व पैसे चैनीसाठी वापरल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे राजूकडे पोलिसांना कोणतीच रोख रक्कम मिळाली नाही.

फसवणुकीचा आकडा अजूनही उजेडात नाही

पोलिसांनी राजूला अटक केल्यानंतर अजूनही फसवणुकीचा आकडा प्रकाशात आलेला नाही. त्यामुळे पैसे दिलेल्यांचे पैसे परत मिळतात की बुडीत खात्यात जातात हे कालांतराने समजणार आहे. सदर कारवाई अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रविंद्र गडादी, डीएसपी बी. एस. अंगडी, सीपीआय किशोर भरणी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्थानकाचे फौजदार शशिकांत वर्मा, एएसआय एम. जी. निलाखे, हवालदार राजू कोळी, राजू दिवटे, संदीप गाडीवड्डर, उदय कांबळे, रमेश कोन्नूर यांनी केली. सदर प्रकरणात सहा ते सात जणांची चौकशीही करण्यात आली.

राजूचे ऐषो-आरामी जीवन

दरम्यान, राजूने फसवणुकीच्या पैशातून निपाणीत बंगला घेतला होता. सदर बंगल्याची किंमत 11 लाख दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात दुप्पट आहे. येथे एसी व अन्य हायफाय सुविधा होत्या. हुपरीतील मित्राच्या नावाने दुचाकी खरेदी केली. तसेच गोवा, म्हैसूर, उटी आदी ठिकाणी सहलीवर जात ऐषो-आरामी जीवनासाठी हे पैसे उधळल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related posts: