|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेस्कॉमकडून गणेशोत्सव मंडळांची लूट

हेस्कॉमकडून गणेशोत्सव मंडळांची लूट 

बेळगाव / प्रतिनिधी

गणेशोत्सव काळात 11 दिवस प्रत्येक मंडळाला हेस्कॉमकडून विद्युत पुरवठा करण्यात येत असतो. मागील वषी मर्यादेपेक्षा अधिक वीज वापरल्याचे कारण दाखवून 5 ते 6 हजार रुपयांचा दंड प्रत्येक मंडळाकडून आकारण्यात आला होता. यामुळे मंडळांची हेस्कॉमकडून आर्थिक लूट होत आहे. ही लूट यावषी होऊ नये यासाठी आतापासूनच मंडळांनी एकत्र येण्याची गरज आहे.

बेळगाव शहरात गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. शहरात दिवसेंदिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत चालली आहे. सध्या शहरात 350 हून अधिक लहान-मोठी मंडळे कार्यरत आहेत. या मंडळांना 11 दिवस विद्युत पुरवठा करण्याचे काम हेस्कॉमकडून करण्यात येते. स्वतंत्र मीटर बसवून विद्युत पुरवठा होतो. मीटर घेण्यापूर्वी मंडळांकडून अनामत (डिपॉझिट) रक्कम भरून घेतली जाते. या रकमेतून आलेले बिल वजा करण्यात येत असते. परंतु मागील वषी मंडळांनी कमी वॅट क्षमतेचा मीटर घेऊन अधिक वॅट वीज वापरली, या कारणास्तव दंड आकारण्यात आला आहे. शहरातील अधिकतर मंडळांना दंड भरलेल्या पावत्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिलापेक्षा दुप्पट दंडच मंडळांना भरावा लागला आहे. हेस्कॉमच्या या कारभारामुळे गणेशोत्सव मंडळे मात्र मेटाकुटीला आली आहेत.

मागील वर्षाप्रमाणे यावर्षी मंडळांची लूट होऊ नये, यासाठी आतापासूनच मंडळांनी एकत्र आले पाहिजे. हेस्कॉमच्या गलथान कारभाराबद्दल गणेशोत्सव मंडळांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हेस्कॉमने निर्धारित बिल आकारावे. परंतु अनागोंदी दंड आकारून मंडळांना आर्थिक तोटय़ात घालू नये. समाजातून मिळालेल्या देणगीतून गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो. त्यामुळे मंडळांच्या पदाधिकाऱयांना मिळालेल्या देणगीतून सर्व खर्च करावे लागतात. अशाप्रकारे अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्यास आर्थिक खर्च कसा भागवावा, असा प्रश्न मंडळांसमोर उभा ठाकला आहे.

 

Related posts: