|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेतकऱयांसमोर आता मजुरांचेही संकट

शेतकऱयांसमोर आता मजुरांचेही संकट 

वार्ताहर/   एकसंबा

कृषीप्रधान म्हणून ओळख असणाऱया भारताच्या लोकसंख्येने सव्वाशे कोटींचा आकडा पार केला आहे. देशामध्ये जवळपास 50 टक्के लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. यातून अनेक वर्षापासून हजारो मजुरांना रोजगार मिळाला आहे. मात्र ही बाब आता इतिहासजमा होत आहे. कारण शेती व्यवसायाला सध्या अवकळा आली असून शेतीच्या कामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. पाश्चात्य राष्ट्राच्या अंधानुकरणामध्ये सर्वांनाच स्टाईलिश हाय-फाय जीवनशैलीची भुरळ पडल्याने शेतीमध्ये काम करणे शेतकऱयांच्या मुलांनीही बंद केले आहे. तर यामध्ये मजुरी करणे दूरच.

ज्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे. त्या कुटुंबातील मुलेसुद्धा शेतीकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळत आहे. शेती व्यवसाय फार पूर्वीपासूनचा असल्याने तो परंपरागत आहे. अनेकांची शेती मोठय़ा प्रमाणात असल्याने अशा शेतकऱयांना मनुष्यबळाची गरज आहे. मनुष्यबळाअभावी अनेक शेतीची कामे खोळंबली आहेत. आणि त्यामुळे शेतकऱयांसमोर अनेक संकटे उभी ठाकत आहेत. खरिप हंगामामध्ये तर शेती तेजीमध्ये चालत असते. पेरणीचे दिवस असल्याने मजुरांची आवश्यकता असते. शेती जास्त प्रमाणात असणाऱया शेतकऱयांना तर मजूर गरजेचेच आहेत.

कालांतराने शेती व्यवसायामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. शेतीची नांगरणी, औषध फवारणी, पिकांची कापणी अशी अनेक कामे मनुष्यबळाऐवजी यंत्राच्या साहाय्याने होत आहेत. मात्र या यंत्रांना हाताळण्यासाठी तरी किमान मजुरांची आवश्यकता असते. मात्र आता लोकांची विशेषतः तरुणांची मानसिकता अशी झाली आहे की शहरामध्ये जाऊन पडेल ती कामे करण्याची तयारी आहे. मात्र शेतामध्ये काम करण्यासाठी कोणीही तयार नाही. मजुरांच्या या तुटवडय़ाला काही प्रमाणात शासकीय योजनाही कारणीभूत ठरत आहेत.

शासनाकडून मोठय़ा प्रमाणात अनेक योजना राबविल्या जात आहेत. पण त्या शेतकऱयांपर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे शेतकऱयांची शेती काही प्रमाणात तोटय़ात येत असल्याने याचा फटका मजुरांवर बसला. परिणामी मजूर शेती व्यवसाय सोडून इतर व्यवसायाकडे वळत आहेत.

एका शेतकऱयाची शेती जवळपास 10 एकर असेल तर किमान मजूर 10 ते 12 सहज लागतात. तर 3-4 एकर शेती असल्यास 5 मजूर गरजेचे असतात. दररोज पुरुषाला एका वेळेला 150 रुपये पगार मिळतो. तर दोन वेळा काम केल्यास 300 रुपये पगार पडतो. तेच महिला मजुरांना एक वेळेला 80 रुपये तर तर दोनवेळा कामासाठी 150 रुपये मिळतात. सर्वत्र मोठय़ा प्रमाणात रोजगार संधीचा अभाव आहे, असे वारंवार म्हटले जाते, हे पूर्णसत्य नाही. अनेक क्षेत्र अशी आहेत जिथे काम करण्यासाठी मनुष्यबळच मिळत नाही हेही वास्तव लक्षात घेतले पाहिजे.

आरामात कसाबसा दिवस घालवायचा आणि महिनाअखेर पगार घेऊन पुन्हा आराम करायचा. ही मानसिकता सर्वत्र बळावत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोणामध्येच श्रमप्रतिष्ठा उरली नाही, असे खेदाने म्हणावे लागते. शेतीसारख्या व्यवसायामध्ये कितीही मजुरी दिली तरी काम करण्यास तयार होत नाही. हीच खरी शेतकऱयांची शोकांतीका आहे. 

Related posts: