|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » देशद्रोही आमदारांवर गुन्हे दाखल करा

देशद्रोही आमदारांवर गुन्हे दाखल करा 

प्रतिनिधी/ खानापूर

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला विरोध करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी व एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आमदारकी रद्द करून त्यांची देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी करणारे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे श्रीराम सेना खानापूर तालुका प्रमुख ओगले यांनी तहसीलदार शिवानंद उळागड्डी यांना सादर केले.

तत्पूर्वी लक्ष्मी मंदिरापासून शिवस्मारक चौकापर्यंत श्रीराम सेनेने दुचाकी रॅली काढून दोन्ही आमदारांचा निषेध करणाऱया घोषणा दिल्या. हिंदुस्थान में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, असे म्हणत दोघांच्याही प्रतिकात्मक पुतळय़ांचे दहन करण्यात आले.

यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्यलढय़ात अनेकांनी वंदे मातरम् गीताचा उच्चार करून प्राणांची आहुती दिली. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत असल्याने त्याचा मान-सन्मान राखणे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. असे असताना आमदार अबू आझमी व वारीस पठाण यांनी सच्चा मुसलमान कधीही वंदे मातरम् म्हणणार नाही, असे चक्क विधानसभेत विधान करून एक प्रकारे भारतभूमी व मातृभूमीचा अवमान केला आहे. यामुळे त्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्यांची आमदारकीदेखील रद्द करून देशाबाहेर हाकलावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना पंडित ओगले म्हणाले, माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम व स्व. एम. सी. सगरा क्रांतिकारी अश्फाकमुल्ला खान यांनीदेखील भारत भूमीसाठी फार मोठा त्याग केला आहे. ते सच्चे मुसलमान आहेत. त्यांच्या विचाराचे अनुकरण अबू आझमी व वारीस पठाण यांनी करावयास हवे होते. असे असताना त्यांनी वंदे मातरम् गीताबद्दल बेताल वक्तव्य करून भारतभूमीचा अवमान केला आहे. यामुळे त्यांना देशातून तडिपार करावे, अशी मागणी केली.

यावेळी ऍड. एम. वाय. कदम व भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अभिजीत चांदिलकर यांनीदेखील विचार व्यक्त केले. तहसीलदारांनी निवेदनाचा स्वीकार करून ते पंतप्रधान व गृहमंत्र्यांना पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाऊ चव्हाण, मिथुन कुंभार, अनंत सावंत, पवन गायकवाड, महेश गुरव, पंकज कुट्रे, किरण घाडी, पुंडलिक मुतगेकर, वांद्रे, मोहन नंदगडकर, विश्वनाथ सुतार, संजीव गुरव, अजय सुतार, मारुती सावंत, संदीप शेमले, मोनाप्पा सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  

Related posts: