|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तिलारी खोऱयात अभयारण्याचा विचार

तिलारी खोऱयात अभयारण्याचा विचार 

दोडामार्ग सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे शेवटचे टोक असलेल्या तिलारी खोऱयात अभयारण्य उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘तिलारी सॅन्चुरी’ या नावाने हे अभयारण्य साकारणार आहे. मात्र, त्यापूर्वी या भागातील विशेषतः रानटी हत्तींचे वास्तव्य असलेल्या गावांचे सासोली कळणे सडा सीमेलगत सडा येथे पुनवर्सन करण्यात येणार आहे. पावसाळय़ानंतर या अभयारण्य निर्मितीची कार्यवाही सुरू होणार आहे.

दोडामार्ग तालुक्यातील या तिलारी खोऱयात गेल्या काही वर्षापासून रानटी हत्तींचे वास्तव्य वाढले आहे. किंबहुना तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत जलाशय हे या कर्नाटकातून आलेल्या रानटी हत्तींचा जणू हक्काचा अधिवास बनला आहे. 2002 मध्ये रानटी हत्तींना हाकलून लावण्यासाठी ‘एलिफंट बॅक टू होम’सारखी मोहीम्, मिरची पूडयुक्त दोरखंड, खंदक यासारखे अनेकानेक उपाय शासनाच्या वनविभागाकडून झाले. परंतु हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त अद्यापपर्यंत होऊ शकला नाही, उलट कागदोपत्री ‘जैसे थे’च राहिला. या खोऱयातील मुळस, हेवाळे, बांबर्डे, धारिवडे, मोर्ले, केर, घोटगेवाडी, मांगेली, झरेबांबर आदी गावातील शेतकऱयांना या रानटी हत्तीपासूनचा धोका कायम राहिला. अलिकडच्या काळात तर मुळस, हेवाळे, बांबर्डे परिसरात दिवसाढवळय़ा हत्तींचे दर्शन होऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाच्या वरिष्ठ पातळीवर हत्तींना हटविण्याच्या फंदात न पडता त्यांच्यासाठी अधिवास निर्माण करण्याचा विचार पक्का झाला आहे. याच पाश्वभूमीवर ‘तिलारी सॅन्चुरी’ अर्थात अभयारण्य उभारण्याची कार्यवाही सुरू होऊ लागली आहे.

अभयारण्याची निर्मिती होते कशी?

जंगली वन्यप्राणी पशू, पक्षी यांचा वाढता वावर व संभाव्य धोका लक्षात घेऊन अभयारण्य उभारले जाते. अभयारण्य उभारताना दोन पर्याय ठेवले जातात. त्यापैकी एक म्हणजे वन्यप्राण्यांचे वास्तव्य असणाऱया ठिकाणी मानवी वस्तीला ‘जैसे थे’ ठेवून अभारण्य उभारणे किंवा संपूर्ण लोकवस्तीचे पुनर्वसन करणे. पहिल्या पर्यायाचा अवलंब केल्यास अभयारण्य क्षेत्राचा संपूर्ण ताबा अभयारण्य प्रशासन व वनविभाग यांच्याकडे येतो. संबंधित गावागावांच्या सीमेवर बंदुका, शस्त्रास्त्रs, पिंजरे, वॉकीटॉकी सारखी संपर्क यंत्रणा, सुसज्ज वाहने असलेली चेकपोस्ट उभारून परिसरात लक्ष ठेवले जाते. तसेच गावात तातडीच्या वैद्यकीय सुविधा तत्पर ठेवल्या जातात. एवढे असूनही वन्यप्राण्यांकडून एखाद्या नागरिकाचा मृत्यू किंवा जखमी झाल्यास तातडीची भरपाई देण्याची तरतूद केली जाते. मात्र, स्थानिक रहिवाशांचा विरोध होत असेल तर मात्र संपूर्ण लोकवस्तीचे थेट दुसरीकडे पुनर्वसन केले जाते. हे पुनर्वसन करताना त्यांची शेती, बागायती, घरे आदींचे अभयारण्य निर्मितीच्या अनुषंगाने असलेल्या नियमावलीनुसार मूल्यांकन केले जाते. आर्थिक स्वरुपातील रक्कम व पुनर्वसित जागा अशाप्रकारे स्थानिक वस्ती अन्यत्र हलवून अभयारण्य निर्मिती केली जाते.

स्थानिक यंत्रणा अनभिज्ञ

तिलारी खोऱयात रानटी हत्तींचा वावर, भविष्यातील त्यांची होणारी वाढ लक्षात घेऊन प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर तिलारी अभयारण्य उभारणीवर एकमत झाले आहे. मात्र, याबाबत सध्या कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. स्थानिक वनविभाग पूर्णतः अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. तिलारी खोऱयातील मुळस, हेवाळे, धारिवडे, बांबर्डे आदी गावातील अलिकडचे हत्तींचे कारनामे लक्षात घेऊन सासोली, कळणे या दोन गावांच्या सीमेलगत असलेल्या ‘सडा’ येथील विस्तीर्ण क्षेत्रावर पुनर्वसन करण्याचा पर्याय आहे. पावसाळा संपताच अभयारण्य निर्मिती करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी स्थानिकांचे कितपत सहकार्य लाभते, यावरच अभयारण्याचे भवितव्य अवलंबून आहे.

तिलारीचे जंगल अभयारण्यासाठी अप्रतिम………पण?

दरम्यान, अभयारण्य निर्मितीसंदर्भातील कार्यवाहीबाबत दांडेली कर्नाटक येथील अभयारण्यातील अधिकारी एच. डी. प्रकाश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तिलारी खोऱयातील जंगल उभयारण्यासाठी फार सुंदर आहे. मात्र अभयारण्य निर्मितीसाठी स्थानिक जनता कितपत सहकार्य देऊ शकते, यावरही बरेच काही अवलंबून असल्याचे स्पष्ट केले. सन 2002 मधील ‘एलिफंट बॅक टू होम’ मोहिमेत प्रकाश स्वतः सहभागी झाले होते.

दरम्यान, कोल्हापूर वनविभागाशी संपर्क साधला असता, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोरे अभयारण्य घोषित करण्याचा शासनाचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts: