|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आता रिफायनरीविरोधात मच्छीमारांची स्वतंत्र समिती

आता रिफायनरीविरोधात मच्छीमारांची स्वतंत्र समिती 

प्रतिनिधी/ राजापूर

तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या रिफायनरीच्या विरोधात असलेल्या समित्या आपल्या तलवारी म्यान करीत समर्थन देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. मात्र आता या प्रकल्पाविरोधात नाणार परिसरातील मच्छीमारांनी ‘एल्गार’ पुकारला आहे. शनिवारी येथील मच्छीमारांनी एकत्र येत स्वतंत्र समिती स्थापन करून यामुढे मच्छीमारांच्या समस्यांसाठी लढा देण्याचे ठरवले आहे. याचे स्वतंत्र बॅनर डोंगरतिठा येथे लावून सुमारे 400 मच्छीमारांनी एकत्र येत रिफायनरीविरोधात लढा सुरू केला आहे.

नाणार परिसरातील सुमारे 14 गावांमधील सुमारे 13 हजार 600 एकर जमिनीवर जगातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल्स रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यामुळे येथील हजारो कुटुंबे व त्यांच्या जमिनी या प्रकल्पातर्गत घेतल्या जाणार असल्याने येथील शेतकरी भूमीहिन होणार आहेत. त्यामुळे येथील सर्व पक्षीय पदाधिकाऱयांनी एकत्र येत प्रथम या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कोअर कमिटी, जनहित समिती व संघर्ष समितीची स्थापना केली गेली. या समित्यांच्या माध्यमातून प्रकल्पाला जोरदार विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात या समित्यांनी आपल्या मागण्या पुढे रेटवित आपला विरोध मावळला असल्याचे प्रथमदर्शी तरी तसे दर्शवले आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांमध्ये चलबिचलता सुरू झाली आहे. या समित्यांमध्ये मुस्लिम बांधवांचाही समावेश होता. मात्र मुस्लिम समाज बांधवांशी निगडित असलेल्या मागण्या व समस्यांचा विचार करण्यात येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने व या प्रकल्पाचे दूरगामी थेट परिणाम त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या मच्छीमारीवर होणार असल्याने त्यांनी आता या लढय़ात स्वतंत्र उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुस्लिम बांधवांनी पुकारला ‘एल्गार’

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातही यापूर्वी जन आंदोलने पेटली. मात्र यामध्ये परिसरातील मच्छिमारांनी सहभाग घेतला असल्याने या आंदोलनांनी उग्र स्वरूप घेतले होते, हे वास्तव आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरीविरोधात नाणार परिसरातील मुस्लिम समाज बांधव एकत्र आले आहेत. रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थापन झालेल्या इतर समित्यांनी आपला प्रकल्प विरोधाचा गाशा गुंडाळला असताना मुस्लिम बांधवांनी आपल्या मागण्यासाठी आता ‘एल्गार’ पुकारला आहे. त्यामुळे भविष्यात अणुऊर्जाच्या पार्श्वभूमीवर रिफायनरीच्या विरोधातील आंदोलन जोर धरण्याची शक्यता आहे.

आम्हांला हा प्रकल्पच नको!

नाणार परिसरात हा प्रकल्प ज्या गावामध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. त्या गावांमधील नाणार, सागवे, कातळी गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मच्छीमार समाज बांधव आहेत. या गावांमधील मच्छीमारांचा उदरनिर्वाह हा गावालगत असलेल्या खाडीतील मच्छीमारीमुळे चालू आहे. सुमारे 1 हजार 500 कुटुंबिय आपला मच्छिमारीद्वारे उदरनिर्वाह करीत आहेत. जगातील सर्वात मोठा असलेला हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येत असल्याने याचा परिणाम येथील मच्छीमारी व्यवसायावर होऊन हा व्यवसायच आता बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. येथील मच्छीमारांसमोर उदरनिर्वाहासाठी मच्छीमारीशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नसल्याने त्यांना उपासमारीला समोर जावे लागणार आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी आम्हांला हा प्रकल्पच नको, अशी भूमिका घेत आता या प्रकल्पाच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

मच्छीमार जनहित संघर्ष समिती स्थापन

शनिवारी या परिसरातील मुस्लिम बांधवांनी डोंगरतिठा येथे एकत्र येत प्रकल्प विरोधाचा नारा दिला आहे. यावेळी मच्छीमार बांधवांनी मच्छीमार जनहित संघर्ष समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे यापुढे रिफायनरीविरोधात जनआंदोलन अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.