|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बनणार होता पोस्टर पेंटर… झालो गायक !

बनणार होता पोस्टर पेंटर… झालो गायक ! 

मिमिक्री कलाकार तसेच गायक सुदेश भोसले यांनी उलघडवला जीवन प्रवास, पणजीत वार्तालाप हितगुज कार्यक्रम

प्रतिनिधी/ पणजी

होणार होतो चित्रपटांची पोस्टर रंगवणारा पेंटर पण झालो गायक व मिमिक्री कलाकार अशा शब्दात सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि मिमिक्री कलाकार सुदेश भोसले यांनी हितगुज कार्यक्रमात आपल्या जीवनाचा प्रवास उलघडवून दाखवला. महमद रफी, किशोर कुमार, तलद मेहमूद यांची जूनी लोकप्रिय गीते त्यांनी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध पेले. रसिकांनी देखील जोरदार टाळय़ांची बरसात करून त्यांना चांगली दाद दिली.

पणजीतील कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये हा कार्यक्रम झाला. रसिकांनी खचाखच भरलेल्या त्या ठिकाणी बसायला नव्हे तर उभे राहायला देखील जागा नव्हती. एवढा भरघोस प्रतिसाद भोसले यांना मिळाला. सुपस्टार अमिताभ बच्चन यांचे एकपेक्षा एक डायलॉग म्हणून त्यांनी रसिकांची मने जिंकली.

वार्तालापच्या या हितगुज कार्यक्रमात अस्मिता घाटे यांनी त्यांची मराठीतून मुलाखत घेतली व ती उत्तरोत्तर रंगत गेली. ‘स्वस्तिक’ या संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मनोगत व्यक्त करताना भोसले यांनी सांगितले की, आपले वडील पोस्टर रंगवणारे पेंटर होते. एकदा मला 14 वर्षाचा असताना राजेश खन्ना, हेमामालीनी यांच्या चित्रपटाचे पोस्टर रंगवायला सांगितल्यावर मी ते हुबेहुब रंगवले. आश्चर्य म्हणजे ते सर्वांना आवडले व थिएटर्सवर लावण्यात आले. त्यानंतर मी अनेक वर्षे चित्रपटांची पोस्टर रंगविली आणि ती सिनेमागृहांवर झळकली.

हे सर्व करीत असताना चित्रपट पहायचे, विविध गायकांची गाणी ऐकायची त्यातून गाणी म्हणायची व डायलॉग, नक्कल करायची आवड निर्माण झाली. ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट पाहिला आणि तेव्हापासून गाणी म्हणून नक्कल सादर करू लागलो. कॉलेजमध्ये असताना तेच केले. विविध गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागलो. लोकांना गाणी, मिमिक्री अर्थात नक्कल आवडू लागल्या. परिणामी लोकप्रियता वाढली, असे भोसले यांनी नमूद केले.

मी चांगला पेंटर होणार अशी अशा वडील बाळगून होते. परंतु मी बाहेर दुसरेच करायचो हे वडिलांना माहित नव्हते. ते लोकांनी त्यांच्या कानावर घातले. माझा शो वडिलांनी एकदा पाहिला आणि शिटय़ा टाळय़ा ऐकून ते देखील आवाप् झाले. तेथूनच मी गायनाकडे, मिमिक्रीकडे वळलो, असे ते म्हणाले.

प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है, अगर तुम न होते, बार बार देखो हजार बार देखो, अशा प्रकारची जुनी अवीट गोडीची गाणी त्यांनी दमदार आवाजात म्हणून दाखवली. ‘मेलडी मेकर्स’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ऑर्केस्टामध्ये त्यांची वर्णी लागली. त्यांनी परदेशातही अनेक शो केल्याची माहिती दिली. त्यांनी सादर केलेल्या विविध गाण्यांवर रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांची पत्नी हेमा भोसले यांनी काही गाण्यांवर पियानो वाजवून त्यांना साथ दिली. त्यांचेही रसिकांनी कौतुक केले.

समई प्रज्वलित करून भोसले यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रा. अनिल सामंत यांनी स्वागत केले तर प्रवीण गावकर यांनी आभार मानले.

Related posts: