|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीतून सहाव्यांदा विजयी होण्यासाठी पर्रीकर सज्ज

पणजीतून सहाव्यांदा विजयी होण्यासाठी पर्रीकर सज्ज 

प्रतिनिधी/ पणजी

पणजी मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी होण्यासाठी आपण सज्ज असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. पणजीची श्री देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदार यांचा पाठिंबा आपल्या पाठीशी कायम आहे. गोव्यातील जनतेचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे असेही ते म्हणाले. बुधवारी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पर्रीकर आपला उमेदवारी अर्ज भरतील.

गोवा आज एका वेगळय़ा दिशेने चालला आहे. विकासाच्या दिशेने गोवा झपाटय़ाने पावले टाकत आहे. गोव्यातील तरुणाईला वेगळी स्वप्ने दृष्टीपक्षात दिसत  आहेत. विकास, रोजगार, स्वयंपूर्णता, आर्थिक सक्षमता अशा सर्वच क्षेsत्रात गोवा अग्रेसर आहे. त्यामुळे गोव्याला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. आजपर्यंत भाजपनेच गोव्याला सक्षम आणि स्थिर नेतृत्व दिले आहे. त्यामुळे गोव्यातील जनता भाजपच्या पाठीशी आहे आणि जनतेचा भाजपवर विश्वास आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न आपण याअगोदरही केला आहे आणि यापुढेही करीन असेही ते म्हणाले.

गोंयकारपण हा एकमेव मुद्दा

गोंयकारपण हा एकमेव विषय आणि मुद्दा घेऊन सरकार वाटचाल करीत आहे. गोव्याची प्रगती, विकास आणि गोयकारांचा सर्वांगिण विकास ही सरकारची ध्येयधोरणे आहेत. गोंयकारपणाला केंद्रबिंदू मानून राज्याचा कारभार चालविला जात आहे. त्यामुळे भाजपच्या सत्ताकाळात गोव्याचा विकास झपाटय़ाने वाढला. मोठमोठे विकास प्रकल्प आज गोव्यात येत आहेत. येत्या काळात मोठय़ा रोजगाराच्या संधी गोव्यात उपलब्ध होतील. गोव्यातील तरुणांना केंद्रीत ठेऊनच सरकारने रोजगार धोरण निश्चित केले आहे. गोव्याच्या आवश्यकतेनुसार रोजगार हेच सरकारचे धोरण आहे असेही ते म्हणाले.

गोव्यासाठीच पुन्हा गोव्यात

गोवा ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. देशासाठी योगदान देण्याची जबाबदारीही मी पार पाडली, पण ज्यावेळी गोव्यासाठी परत यावे अशी आग्रही मागणी केली गेली त्यावेळी आपण पुन्हा गोव्यात आलो. गोव्यातील राजकीय क्षेत्रातील प्रादेशिक पक्षासह अपक्ष आमदारानाही आपले नेतृत्व हवे होते. त्यामुळे मगो, गोवा फॉरवर्ड यांनी पेलेल्या मागणीचा आदर राखून गोव्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी आपण पुन्हा गोव्यात आलो व मुख्यमंत्री बनलो.

ध्येयधोरणे निश्चित करून हाती घेतलेले प्रकल्प पूर्णत्वास नेणे गरजेचे होते. त्याचबरोबर राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी बसविणेही अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे गोव्यात येणे जास्त आवश्यक होते. एक वेगळा गोवा सर्वांच्या मदतीने तयार करायचा आहे. सुजलाम, सुफलाम गोवा येणाऱया पीढीसाठी घडवायचा आहे आणि तेच आपले लक्ष्य असल्याचे ते म्हणाले.

 बुधवारी 2 ऑगस्टला उमेदवारी अर्ज भरणार

पणजी मतदारसंघाचे उमेदवार म्हणून मनोहर पर्रीकर यांच्या नावाची पक्षाने अधिकृतपणे घोषणा केली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर बुधवार 2 ऑगस्ट रोजी पणजी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी होण्यासाठी पर्रीकर सज्ज झाले आहेत. सकाळी 11 वाजता कार्यकर्ते आणि पक्षाचे आमदार यांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज भरतील व त्यानंतर प्रचारकार्याला गती येईल.

Related posts: