|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिक्षक -पालकांना कधीच विसरु नका

शिक्षक -पालकांना कधीच विसरु नका 

प्रतिनिधी / बेळगाव

शिक्षक समाजाला वळण देतात. सुसंस्कारित समाज निर्मितीचे काम शिक्षक करतात. यामुळे कितीही मोठे झालात तरी पालकांना व शिक्षकांना कधीही विसरु नका, असे मार्गदर्शन तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू यांनी केले.

चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्यावतीने रविवारी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठीचा ‘सक्सेस फॉर्मुला’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक प्रभू बोलत होते. त्यांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

मराठा मंदिरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. मार्गदर्शक म्हणून चाटे समुहाचे कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. भारत खराटे उपस्थित होते. कोल्हापूर विभागाचे  प्रा. सर्जेराव राऊत, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे, बेळगाव विभागीय समन्वयक सुहास गुडाळे, सुनिता गुडाळे, बाबुराव भोमण्णावर आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

प्रारंभी सुहास गुडाळे यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्यावतीने यश माने याने तर पालकांच्यावतीने प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी विचार मांडून चाटे समुहाला शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवर तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना झाडांची रोपटी देवून स्वागत झाले. यावेळी बोलताना दीपक प्रभू यांनी शिक्षणाच्या कार्यात चाटे समुहाच्या कार्याचे कौतुक केले. तरुण भारतच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱया विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यशवंत व्हा, एसएससी चॅम्पियन, स्कॉलरशीप मित्र आदी स्वतंत्र पुस्तिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम तरुण भारतने अविरतपणे सुरु केले आहे. ग्रामीण भागातील मराठी मुलांना ही सोय फारच उपयुक्त ठरत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून यश मिळविणाऱयांचा तरुण भारत नेहमीच गौरव करत आले आहे. ध्येय बाळगून अभ्यास केला तर शिक्षणात मोठी प्रगती करता येते, असे ते म्हणाले.

आज सातत्याने पूर्णपणे लक्ष केंद्रित करुन अभ्यास करण्याची गरज आहे. 100 टक्के गुण मिळाले तरी विषय किती समजला हे ही महत्त्वाचे आहे. आमच्या काळात मार्गदर्शन करणाऱया संस्था नव्हत्या. पालक जागरूक नव्हते. मात्र आता चाटे सारख्या संस्था महत्त्वपर्ण भूमिका निभावत आहेत. त्यांचा लाभ करुन घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रा. भारत खराटे व प्रा. सर्जेराव राऊत यांनी योग्य अभ्यास स्पर्धा परीक्षांमध्ये कसा मार्गदर्शक ठरतो याची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करुन दिली. विविध उदाहरणे आणि माहितीच्या आधारावर विद्यार्थी आणि पालकांना त्यांनी माहितीचे भांडार उपलब्ध करुन दिले. प्रा. बाबुराव भोमण्णावर यांनी आभार मानले. प्रा. जयश्री माने यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts: