|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धार्मिक स्थळांवर प्लास्टिक विक्री करणाऱयांचे परवाने होणार रद्द

धार्मिक स्थळांवर प्लास्टिक विक्री करणाऱयांचे परवाने होणार रद्द 

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसप्रमाणे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक वापरासाठी मुभा देऊन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यावर जोर दिला आहे. पण धार्मिक स्थळांवर प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करणाऱया व्यावसायिकांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याचा आदेश नगरविकास खात्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची सूचना केली आहे. 

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याने प्रदूषण निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही. गटारींमध्ये, ओल्या कचऱयामध्ये तसेच रस्त्याशेजारी टाकण्याचा प्रकार होत असल्याने प्रदूषण होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. पण प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. बंदी झुगारून प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. प्लास्टिकबंदीची कारवाई काटेकोरपणे राबविण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना अपयश आले आहे. व्यावसायिक व नागरिकांना वारंवार सूचना देऊनही प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. यामुळे नगरविकास खात्याने ही बाब गांभीर्याने घेतली असून यापुढे प्लास्टिकचा वापर करणाऱया किंवा विक्री करणाऱया व्यावसायिकांचे व्यवसाय परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर किंवा विक्री केल्यास व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, त्यांचा व्यवसाय परवाना तातडीने रद्द करण्यात यावा, अशी अधिसूचना नगरविकास खात्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी तातडीने व काटेकोरपणे करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना कंबर कसावी लागणार आहे.

जनजागृतीकरिता नागरिकांना आवाहन

देवस्थान परिसरात कचऱयाची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत आहे. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे देवस्थान परिसरात प्लास्टिक बंदी करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने देवस्थान मंडळांना सूचना द्यावी. प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीकरिता नागरिकांना आवाहन करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. यामुळे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध देवस्थानांना सूचना केली आहे. सौंदत्ती येथील यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होते. परिणामी प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. यामुळे यल्लाम्मा देवस्थानच्यावतीने नगरपालिकेला नोटीस बजावून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱया व विक्री करणाऱयांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे. सध्या देवस्थान परिसरातील व्यावसायिकांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related posts: