|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दुबईत नोकरी लावण्याच्या आमिषाने दीड लाखाचा गंडा

दुबईत नोकरी लावण्याच्या आमिषाने दीड लाखाचा गंडा 

गणेशपूर येथील बँक कर्मचाऱयाची फसवणूक, पाच जणांविरुद्ध

प्रतिनिधी / बेळगाव

बँक ऑफ अमेरिकेच्या दुबई शाखेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या एका बँक कर्मचाऱयाशी संपर्क साधून भामटय़ांनी दीड लाखांचा गंडा घातला आहे. यासंबंधी शनिवारी कॅम्प पोलीस स्थानकात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी मिळेल या आशेने टप्प्याटप्प्याने भामटय़ांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत.

सरस्वतीनगर, गणेशपूर येथील अब्दुल जब्बारखान (वय 52) यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. इम्रान, जुनियाद अहमद, अजय शर्मा, निधी शर्मा, रवी सिंग या पाच जणांनी दुबईत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अब्दुल यांची फसवणूक केली आहे. या भामटय़ांनी सतत चार महिने अब्दुल यांच्याशी संपर्क साधत आपल्या बँक खात्यात पैसे जमा करून घेतले आहेत.

कॅम्पचे पोलीस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडे यांनी भा.दं.वि. 420 कलमान्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला असून भामटय़ांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून काही महिन्यांपूर्वी जॉब डॉट कॉम या वेबसाईटवर अब्दुल यांनी बँक ऑफ अमेरिकेच्या दुबई शाखेत नोकरीसाठी अर्ज केला होता. अब्दुल हे नोकरीच्या शोधात आहेत, हे समजताच भामटय़ांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

दुबईतील नोकरी मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. त्यासाठी तुम्ही आमच्या बँक खात्यावर 3 हजार 300 रुपये भरा, असे सांगत भामटय़ांनी अब्दुल यांना पैसे भरण्यास भाग पाडले. अशाच पद्धतीने 20 फेब्रुवारी ते 20 जून 2017 या चार महिन्यांच्या काळात भामटय़ांच्या सांगण्यावरून नोकरीच्या आशेने अब्दुल यांनी 1 लाख 43 हजार 685 रुपये भामटय़ांच्या बँक खात्यात जमा केले.

इम्रानसह पाच जणांनी सांगतील तशा पद्धतीने पैसे भरूनही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे संशय येऊन अब्दुल यांनी वरि÷ पोलीस अधिकाऱयांची भेट घेतली. नोकरीच्या आमिषाने आपली आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती अधिकाऱयांना दिली. त्यानंतर कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले. जॉब  डॉट कॉम या साईटवर नोकरीसाठी केलेले अर्ज पाहून भामटय़ांनी स्वतः अब्दुल यांच्याशी संपर्क साधला आहे व त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.  

Related posts: