|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हिंडलगा गावच्या नामांतराचा प्रशासनाचा घाट

हिंडलगा गावच्या नामांतराचा प्रशासनाचा घाट 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावचे नामांतर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची कारवाई राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने केली आहे. सरकारी कार्यालयांच्या फलकांवरील नाव बदलण्याची घिसाडघाई केल्यानंतर आता नकळतपणे काही गावांची नावे बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे. थेट नाव बदलण्याऐवजी सरकारी कागदपत्रे तसेच विविध माध्यमांतून ‘हिंडलगा’ऐवजी हिंडलगी असा उल्लेख केला जात आहे. कर्नाटक सरकारचे हे धोरण म्हणजे ‘स्लो पॉईझन’ असल्याची टीका नागरिक करीत आहेत.

  बेळगावसह सीमाभागातील 865 खेडय़ांमध्ये मराठी भाषिकांचे वर्चस्व आहे. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. दाव्याअंतर्गत साक्षी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण कर्नाटक सरकारने सर्वत्र कानडीकरणाची सक्ती सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात बेळगाव हे कर्नाटकचेच आहे हे भासविण्यासाठी राज्य शासनाने आटापिटा चालविला आहे. यापूर्वी बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन भरविण्याची परंपरा सुरू केली. त्यानंतर चारशे कोटीहून अधिक निधी खर्च करून सुवर्णसौधची उभारणी केली.

 कर्नाटक राज्योत्सवाच्या मुहूर्तावर ‘बेळगाव’च्या नामांतराची घोषणा राज्य शासनाने केली. त्या पाठोपाठ शहरातील सरकारी कार्यालयांच्या फलकांवरील नाव बदलण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, नोंदणी कार्यालय अशा विविध सरकारी कार्यालयांच्या फलकांवरील नाव बदलल्यानंतर सरकारी वाहने आणि स्थानिक स्वराज्य कार्यालयांवरील नाव बदलण्यात आले आहेत. नाव बदलण्यासाठी सरकारी आदेश काढून याची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली होती.

 महापालिका व्याप्तीमधील महापालिकेची विभागीय कार्यालये, रस्ते, चौक, शाळा, कॉलेज, खासगी दुकाने, हॉटेल, व्यापारी-रहिवासी संकुले, उद्याने, महापालिकेच्या खुल्या जागांवरील फलक आणि महापालिकेच्या सर्व वॉर्डमधील फलकांवर बेळगावी असा उल्लेख करण्यासाठी आटापिटा राबविण्यात आला. पण ‘बेळगाव’ या नावाला ऐतिहासिक वारसा असल्याने स्वयंस्फूर्तीने नामकरण करण्यास बेळगावची जनता तयार नाही.

  बेळगावनंतर काही उपनगरांच्या नामांतरांचा घाट प्रशासनाने घातला आहे. पण अधिकृत नामांतर करण्याऐवजी आधार कार्ड, लाईट बिल आणि तहसीलदार कार्यालयामधून देण्यात येणाऱया कागदपत्रांमध्ये तसेच जन्म-मृत्यू दाखल्यांमध्ये उपनगरांची आणि गावांची नावे बदलण्यात आली असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘वडगाव’चे नामांतर ‘वडगावी’ असे करण्यात आले होते. अशाप्रकारे नामांतराचे षडयंत्र कर्नाटक शासनाकडून सुरू आहे. अशाच प्रकारे आता जन्म-मृत्यू दाखल्यावर ‘हिंडलगा’ गावाच्या नावाचा उल्लेख ‘हिंडलगी’ असा करण्यात आला असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामुळे कागदपत्रांवर नकळतपणे गावांची नावे बदलण्याचा प्रकार शासनाने चालविला आहे. यामुळे मराठी भाषिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

Related posts: