|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश कधी?

सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश कधी? 

प्रतिनिधी/बेळगाव

सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीकडे शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. जुलै संपत आला तरी विद्यार्थ्यांना नवा गणवेश देण्यात आला नाही. तर ‘शू भाग्य’ योजनेप्रमाणे गणवेश कापड खरेदीमध्येही एजंटगीरी होत असल्याचे बोलले जात आहे.

  कापड खरेदीत कमिशन मिळविण्यासाठी ठरावीक व्यक्तींकडूनच गणवेशाचे कापड घ्यावे तसेच गणवेश शिवून घ्यावा, अशी सक्ती करण्यात येत आहे. गोकाक येथील एका ठरावीक एजंटकडेच मागील वर्षी कंत्राट देण्यात आले होते. यंदा जिल्हा पंचायतीच्या एका प्रभावी सदस्याने हे कंत्राट आपल्या भावाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. यामुळे या दोघांचीही मर्जी राखण्यासाठी यावषी दोघांनाही हे कंत्राट वाटून देण्यात आले असल्याची जोरदार चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे.

गणवेश कपडय़ासाठी लागणाऱया अनुदानाचा धनादेश शाळा सुधारणा मंडळाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतो. त्यामुळे या धनादेशाचा वापर करण्याचा अधिकार शाळा सुधारणा मंडळास आहे. मात्र, बऱयाच शाळांच्या मुख्याध्यापकांनी मंडळाच्या सदस्यांची दिशाभूल करून आणि शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांना अंधारात ठेवून ठरावीक एजंटकडेच गणवेश शिवण्यासाठी कापड दिले असल्याचे बोलले जात आहे. यावषीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन दोन महिने संपत आले तरी अद्यापही सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे भाग्य लाभले नाही. एकीकडे सर्व विषयांची पाठय़पुस्तके नसताना आणि ‘शू भाग्य’अंतर्गत देण्यात येणारे बूटही अद्याप देण्यात आले नाहीत. यामुळे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना यावषी गणवेश आणि बूट-पायमोजे यासाठी वाट पाहावी लागत आहे.

या आठवडय़ात आकाशी रंगाचे कापड गणवेशासाठी आले आहे. मात्र  चॉकलेटी आणि क्रीम रंगाच्या गणवेशाचे कापड आल्यानंतरच विद्यार्थ्यांना गणवेशाचे भाग्य लाभणार आहे. यातही एजंटराज आल्याने कापडाचा दर्जा तसेच शिलाई याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.   

 

Related posts: