|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कर्नाटक सरकारकडून गावांची नांवे बदलण्याचा घाट

कर्नाटक सरकारकडून गावांची नांवे बदलण्याचा घाट 

प्रतिनिधी/ बेळगाव

    बेळगावसह सीमाभाग कर्नाटकाचाच असल्याचे भासविण्यासाठी कर्नाटक शासनाकडून शक्कल लढविण्यात येत आहे. येथील गावांची नांवे बदलण्याचा घाट घातण्यात आला आहे. याकरिता विविध कागदपत्रांवरील गावांची नावे न कळतपणे  बदलण्यात आली आहेत. तसेच बसेसच्या फलकांवर मजगावी, उचगावी असा उल्लेख करण्याचा प्रकार चालविला असल्याने संतापाची लाट पसरली आहे.

 बेळगाव शहराचे नामांतर करून सीमाभाग कर्नाटकाचा असल्याचा कांगावा कर्नाटकाने केला आहे.  सर्वोच्च न्यायालयात पुरावे सादर करावे लागणार असून त्यासाठी कानडीकरणाची सक्ती करण्याचा सपाटा चालविला आहे. पुरावे निर्माण करण्यासाठी शहर परिसरातील उपनगरांची आणि गांवाची नांवे अनधिकृतरित्या बदलण्यात येत आहेत. सध्या वडगाव, मजगाव, उचगाव अशा गावांची नांवे बदलण्यासाठी बसेसवरील फलकांवर वडगावी, मजगावी आणि उचगावी असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच हिंडलगा गांवाचे नांवदेखील बदलण्याचा प्रयत्न सुरू असून जन्म-मृत्यू दाखल्यावर तसेच मोबाईलव्दारे येणाऱया एसएमएसमध्ये ‘हिंडलगा’ ऐवजी हिंडलगी असा उल्लेख करून नांव बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. बसेसवरील फलक, एसएमएस आणि महत्त्वाच्या कागदपत्रांवरील नांवामध्ये बदल करून नवीन नांवे रूजविण्याचा घाट घालण्यात आला आहे.

 उचगाव असे नांव असताना उचगावी असा उल्लेख बसेसवरील फलकांवर करण्यात आला होता. तसेच मजगाव बसवरील फलकावर देखील असेच लिहिण्यात आले आहे. नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतरही नांव बदलण्यात आले नाही. तसेच दिशादर्शक फलक आणि रस्त्याशेजारी लावण्यात येणाऱया किलोमीटरच्या दगडांवरील नांवात बदल करण्यात आला आहे. यामुळे एकंदर शासनाची भूमिका संशयास्पद असून नांवे बदलून कानडी नांवे ठेवण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे.

 बेळगाव शहरावर कब्जा ठेवण्यासाठी स्वतंत्र ध्वज निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटक शासनाने चालविला आहे. राष्ट्रभाषेचा तिरस्कार करून कानडीकरणावर भर देण्याचा प्रकार सुरू आहे.

Related posts: